'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...'; हरिपाठाने खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विठ्ठल भक्‍तीचा जागर

    29-Nov-2023
Total Views |
 
haripath-devotional-music-cultural-festival - Abhijeet Bharat
 
नागपूर : टाळ, मृदंगाच्‍या तालावर वारकरी महाराज, विणेकरी मंडळी व मह‍िला मंडळींनी पावलीचा खेळ सादर करून ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या हॉलमध्‍ये विठ्ठल भक्‍तीचा जागर केला.
 
खासदार सांस्‍कृत‍िक महोत्सव सम‍ितीच्‍या ‘जागर भक्‍तीचा’ या उपक्रमांतर्गत बुधवारी हर‍िपाठाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून ह.भ.प. अन‍िल महाराज अहेर, अभिजीत महाराज जोशी, संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष कांचन गडकरी, ज्ञानेश्‍वर रक्षक, रवी कासखेडीकर, विश्‍वनाथ कुंभलकर यांची उपस्‍थ‍िती होती. दीपप्रज्वलन व विठ्ठल रखुमाईच्‍या प्रत‍िमेला माल्‍यार्पण करून हरिपाठाला प्रांरभ झाला. मांजरखेडचे अनंतराव तसरे यांच्‍या नेतृत्‍वात वारकरी संप्रदायाचे कुणाल फुलझेले व त्‍यांची चमूने हरिपाठ सादर केला. त्‍यांना संवादिनीवर श्रीरंग श्रीरामपंत जोशी यांनी साथ दिली.
 
हरिपाठाच्‍या माध्‍यमातून हरिपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न यावेळी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित विठ्ठल भक्‍तांनी केला. ‘तो हा विठ्ठल बरवा’, ‘हरी मुखे म्‍हणा’, ‘जय जय रामकृष्‍ण हरी’, ‘नामसंक‍िर्तन वैष्‍णवाची दोरी’, ज्ञानोबा माऊली’ अशा विविध विठ्ठल रखुमाईच्‍या सुरेल भजनांना टाळ, मृदूंगाची जोड म‍िळाली. पावलीच्‍या या भजनांनी वातावरण अधिक प्रसन्‍न केले. नंतर वारकऱ्यांनी फुगडीचा खेळही सादर केला. कांचनताई गडकरी व रेणुका देशकर यांनी देखील फुगडी घातली. उपस्‍थ‍ित सर्व हरिनामात तल्‍लीन झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रेणुका देशकर केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विजय फडणवीस यांनी सहकार्य केले.