नागपूर : यंदा हिवाळा सुरु होऊनही नागपुरातील नागरिकांना गर्मीचाच सामना करावा लागत होता. सूर्यदेवता देखील चांगलेच तापायला लागले होते. मात्र, रविवारपासून हवामानाने उपराजधानी नागपूरसह राज्यभरात नवे वळण घेतले. सोमवारी पहाटेपासून नागपुरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. आज मंगळवारी पहाटेपासूनही वरुणराजा धो-धो बरसत होता. हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे संपूर्ण नागपूर शहराने जणू धुक्याची चादर ओढली आहे. यासोबत तापमानातही अचानक घट झाल्याने नागपूर गारठल्याचा अनुभव येत आहे.
विदर्भासह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही कायम होता. सोमवारी हलका पाऊस झाला, तर मंगळवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. हवामानातील बदल आणि पावसामुळे उपराजधानीत तापमानाचा पारा अचानक घटला. एकीकडे हवामान बदलामुळे शहराच्या तापमानात घट झाली, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उपराजधानीसह विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडले आहे.
अवकाळी पावसामुळे उपराजधानीसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरचे कमाल तापमान 6.4 अंश सेल्सिअसने घसरून 24.2 अंश सेल्सिअसवर आले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात
रविवार मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पुराच्या तडाख्यातून शेतकरी अद्याप सावरला नसून मागील नुकसानीची भरपाई प्रशासनाकडून अद्याप मिळालेली नसताना पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे ते म्हणाले.