नागपूर : मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागात अवकाळी पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. आज यवतमाळ वगळता राज्यात कुठेही गारपीट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील जवळपास सर्वच भागात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे. त्यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मंगळवारी मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद आणि विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यात गारपीट आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
शनिवारी अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि उच्च पातळीचे हवामान कमकुवत होऊन वातावरण थंड होईल. तसेच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊन ते बांगलादेश आणि बर्माकडे सरकणार आहे. मात्र त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
नागपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट
नागपूर शहरात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पारा काही अंशांनी घसरला आहे. आज सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हीच स्थिती नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. बुधवारनंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नागपूर जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, बाभूळगाव तालुक्यात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे, बुलढाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.