- ३० वर्षापूर्वीचे विद्यार्थी आलेले एकत्र
- जिल्हा परिषद शाळेत स्नेहमिलनाचा पहिलाच प्रसंग
वाडी : हिंगणा मार्गावरील एसआरपी कॅम्प जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात ३० वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्याचा स्नेह मिलन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक अजाबराव कोल्हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून भारती गोन्नाडे,बल्की, विजय भगत, मंगला कुबडे , कोहळे, सर्वे , प्रभा मुळे , कलावती पाटील , वंदना घोरमाडे , रिठे , जाधव , पुष्पा काकडे उपस्थित होते.
आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेत न झालेला आगळावेगळा स्नेह मिलन सोहळा ३० वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यानी उत्कृष्ठपणे केल्याचे कार्यक्रमाच्या आयोजक मुख्याध्यापीका वीणा काळे यांनी प्रास्ताविकतेमधून सांगीतले. विद्यार्थ्यांनी आयोजन केलेल्या कार्यक्रमाचे व त्याच्या प्रगतीचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी माजी मुख्याध्यापक अजाबराव कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. शिक्षिका सुशिला गुलसुंदरे यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांचा गौरव केला. शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वॉटर बॅग, टिफिन, पेन्सिल बॉक्स व चॉकलेट भेट दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा काळे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संचालन माजी विद्यार्थी पंकज मोरे, शेखर धापोडकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी विक्रम इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी विक्रम इंगोले, सुधीर मांडस्कर, अश्विन पवार, वर्षा पडोळे यांनी केले.