गुत्थ्यावर खंडणीसाठी गेलेल्या गुंडांनी ग्राहकाला लुटले; राजीवनगरात प्रचंड खळबळ

    27-Nov-2023
Total Views |
 
nagpur-liquor-shop-robbery-rajeevnagar - Abhijeet Bharat
 
नागपूर : दारूच्या दुकानात खंडणी मागायला गेलेल्या सराईत गुन्हेगारांनी एका ग्राहकाला लुटले. जिवे मारण्याची धमकी देत त्याच्या पॅन्टच्या खिशातून बळजबरीने साडेचार हजार रुपये हिसकावले. ही खळबळजनक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत राजीवनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी रामप्रसाद शेंडे (40) रा. भीमनगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत पाचही आरोपींना अटक केली आहे. याघटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अक्षय सूर्यवंशी (24), आकाश उर्फ राहुल सिंग (24) दोन्ही रा. राजीवनगर, आतिष शेंडे (25) रा. वैशालीनगर, सोनू उर्फ वसीम खान (22) रा. राजीवनगर आणि तुषार पेंदाम (23) रा. गोंड मोहल्ला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
 
रामप्रसाद हे मिस्त्रीचे काम करतात. त्यांना दारूचे व्यसन आहे. रात्री ते राजीवनगर स्मशानभूमीजवळील दारूच्या दुकानात गेले. रात्रीची वेळ असल्याने दुकानात ग्राहकांची वर्दळ होती. दरम्यान पाचही आरोपी तेथे आले. कर्मचाऱ्यांना फुकटात दारू मागितली. त्यांनी दारू देण्यास नकार दिला असता दुकान चालवायचे असेल तर हप्ता द्यावा लागले अशी धमकी देत उपस्थित ग्राहकांनाही धमकावले. रामप्रसाद यांना चाकू दाखवून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील साडेचार हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. विरोध केला असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि पसार झाले. रामप्रसाद आणि दुकानातील कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरोडा आणि खंडणीचा गुन्हा नोंदवत पाचही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.