नागपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर, स्नेह नगर येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा अतिशय सुश्राव्य कार्यक्रम सादर झाला. युवा कलाकार मुकुंद कुथे आणि देविका मार्डीकर यांनी अत्यंत ताकदीने शास्त्रीय गायनाच्या पक्क्या बैठकीची चुणूक दाखवत भजनसेवा दिली. तबल्यावर अथर्व शेष व हार्मोनियमवर आशिष निलाटकर यांनी त्यांना उत्तम साथ दिली.
युवा निवेदक वैदेही खोपकर हिने सूत्रसंचालन केले. कानडा राजा पंढरीचा, जोहार मायबाप जोहार, अरे अरे ज्ञाना अशी अनेक सरस गीते तसेच, प्रेक्षकांच्या फर्माइशीवर काही गीते या दोन कलाकारांनी फार उत्तम प्रकारे सादर केली. स्नेह नगर विठ्ठल मंदिर उत्साही श्रोत्यांच्या गर्दीने गजबजले होते, असे स्नेहनगर विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले.