- विदर्भ साहित्य संघाचे आयेाजन
नागपूर : प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी गायिलेली विविध भावगीते, नाट्यगीते, कबिरांची भजने प्रसिद्ध गायक मुकुंद ओक यांनी सादर करून स्वरांजली वाहिली.
शनिवारी प्रसिद्ध गायक डॉ. मुकुंद ओक यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम अमेय दालन, विदर्भ साहित्य संघ येथे पार पडला. सुरुवातीला विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र डोळके यांनी डॉ. मुकुंद ओक यांचा सत्कार केला. हार्मोनियम वादक शिरीष भालेराव यांचे स्वागत सरचिटणीस विलास मानेकर यांनी केले तर तबला वादक विरथ वाडेगावकर यांचे स्वागत व्यवस्थापक उल्हास केळकर यांनी केले. या कार्यक्रमाला निवृत्त न्या. विकास सिरपुरकर व ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांची विशेष उपस्थिती होती.
‘उठी उठी गोपाला’ या गीताने डॉ. मुकुंद ओक यांनी कार्यक्रमाची शानदार सुरुवात केली. त्यानंतर राग खमाजमधील टप्पा ‘ओ दिलदारा आ जा रे’ हे गीत सादर केले. राजा बढे यांचे भावगीत ‘प्रेम केले, प्रेम केले’ त्यानंतर राग शंकरामधील ‘सिरपे धरी गंगा’, संत कबिरांची भजने ‘हीरना समझ’, ‘निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा’, संगीत एकच प्यालामधील पद ‘प्रभु मजवरी कोपला’, संगीत द्रौपदी मधील ‘तात करी दुहिता विनाशा’ अशी एकाहून एक सरस पदे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कबिराचे भजन ‘धुन सुन के मनवा मगन हुवा जी’ या पदाने त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक अलोणी यांनी केले.