नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव - 2023 मध्ये ‘भक्तीचा जागर’ या सकाळच्या सत्रातील उपक्रमांतर्गत रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात मानवाच्या कल्याणासाठी परित्तदेशना (महापरित्राण) पाठ करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई गडकरी, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापक माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, माजी आ. डॉ. मिलिंद माने, माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम, संयोजक संदीप गवई, सतीश सिरसवान यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पठणाला सुरुवात करण्यात आली.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानवी कल्याणाचा संदेश या परित्राण पाठातून दिला होता. संकटांचा नाश करणारा, संपन्न करणारा, रोगांचा नायनाट करणारा, दीघायुष्य प्रदान करून निर्वाणाकडे पोहोचवणाऱ्या या परित्राण पाठामध्ये भंतेजींनी सहभाग घेतला. मोठ्या संख्येने धम्मबांधव परित्राण पाठामध्ये सहभागी झाले होते. भिमस्तुतीने या पाठाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
मनोरंजनासोबत लोकशिक्षण व लोकप्रबोधनाचे कार्य खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने करण्यात येत असून ‘भक्तीचा जागर’ या उपक्रमाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे. परित्राण पाठाच्या यशस्वीतेसाठी इंद्रजित वासनिक, शंकर मेश्राम, सतीश चंदनखेडे, नेताजी गजभिये, राजेश नंदेश्वर, सुबोध मानवटकर,सुधीर जांभुळकर अशा अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.