'वारी' आणि 'तमाशा' सामान्यांच्‍या अभिव्यक्तीचे माध्यम - संदेश भंडारे

    25-Nov-2023
Total Views |

maharashtra-varied-traditions-tamasha-cultural-harmony - Abhijeet Bharat 
नागपूर : ‘वारी’ आणि ‘तमाशा’ या दोन्ही परंपरा एकमेकांस पूरक असून दोघांचेही दैवत ‘विठ्ठल’ हेच आहे. या दोन्ही परंपरांनी महाराष्ट्राच्या मनाचा उदारमतवादी मानस तयार करण्‍याचे काम केले आहे. या दोन्ही परंपरामध्ये शाहिरांना व सोंगाड्याना अभिव्यक्त होण्याची संधी मिळते तर वारीमध्ये गोरगरीब, बहुजन, स्त्रियांना अभिव्यक्‍त होण्याची संधी मिळते, असे मत सुप्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी व्‍यक्‍त केले.
 
विदर्भ साहित्य संघाच्‍यावतीने सुप्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या गाजलेल्या निवडक छायाचित्रांचा स्लाईड शो आणि निवेदन-व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. विदर्भ साहित्य संघाचे सांस्कृतिक संकुलातील अमेय दालनात झालेल्‍या या कार्यक्रमात लेखक व भाषांतरकार प्रफुल्ल शिलेदार व लेखक प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधला.
 
तमाशाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनमानसात लोकरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा उल्लेख करताना त्यांनी तमाशाच्या माध्यमातून जनमानसात कसे शिक्षण विषय जागृती पसरवली, याबद्दल माहिती दिली.
 
महाराष्ट्राच्या दोन लोकपरंपरां (वारी आणि तमाशा) यांचे छायाचित्रणाच्या माध्यमातून जतन करण्याचे ऐतिहासिक कार्य संदेश भंडारे यांनी केले असून त्‍यांनी त्यांचा दोन्ही संशोधन प्रकल्पातील गाजलेल्या निवडक छायाचित्रांचा स्लाईड शो यावेळी प्रदर्शित केला.