शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव

    24-Nov-2023
Total Views |

minister deepak kesarkar tasted school nutrition
 
मुंबई :
विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार तयार केलेले पदार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी सायंकाळी स्वत: चाखून बघितले. या पोषक तत्व असलेल्या आणि रूचकर पदार्थांचा लवकरच विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश केला जाणार आहे.
 
राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत तज्ज्ञांनी सूचविलेले पदार्थ प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल किचन चालविणाऱ्या महिलांमार्फत तयार करण्यात आले. या पदार्थांचा मंत्री केसरकर यांच्यासह प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, सहसचिव इम्तियाज काझी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यासह तज्ज्ञांच्या समिती सदस्यांनी बुधवारी आस्वाद घेतला.
 
विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याबरोबरच आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ द्यावेत, अशा सूचना मंत्री केसरकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोषण आहार ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीतील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली नाचणीच्या वड्या, भगरीचा उपमा, भगरीचा शिरा, भगरीची खीर, मटर पुलाव, सोया पुलाव, गोड पुलाव, अंडा बिर्याणी, मूगडाळ खिचडी, गोड खिचडी, कडधान्य, मसाले भात, तांदळाची खीर, असे विविध पदार्थ तयार करण्यात आले. या पदार्थांपैकी एक मुख्य पदार्थ, एक गोड पदार्थ आणि सलाद देण्यात यावा, अशी मंत्री केसरकर यांची संकल्पना आहे.
 
ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.