नागपूर : समर्थ रामदास स्वामी हे राजकीय संत होते. त्यांनी त्यांच्या आचरणातून आणि साहित्यातून कधीही विरक्ती आणि स्पृश्य-अस्पृश्य, उच्च-निच, रंक-राद असा भेद केला नाही. ते सामाजिक समरसतेचे पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन राज्यशात्राचे अभ्यासक डॉ. प्रवीण भागडीकर यांनी केले. यावेळी त्यांनी समर्थ रामदासांवर काही लोकांकडून आणि संस्थाकडून घेतलेले अनेक आक्षेप कसे चुकीचे आहेत हे उदाहरणासहित आणि पुराव्यासहीत अत्यंत प्रभावीपणे मांडले. दरवर्षी विदव्रत्न डॉ. के. ल. उपाख्य भाऊजी दप्तरी यांची जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
रामदास स्वामी हे कोणत्याही एका जातीचे किंवा धर्माचे नसून ते संपूर्ण मानव जातीच्या तसेच महाराष्ट्र धर्माच्या जागरणाचे प्रेरक स्त्रोत होते, असे सांगताना डॉ. भागडीकर पुढे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानी ते होते किंवा नव्हते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी उपदेश केला होता किंवा नव्हता या बाबतीतही निष्कारण वाद उत्पन्न करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. समर्थ रामदास हे बलोपासक, कुशल संघटक, समाज जागरण कर्ते आणि तत्कालिन समाजाच्या मनात राष्ट्रभक्ती जागविण्याचे महनिय कार्य करणारे सक्रीय असे सामाजिक संत होते. राजकारणाला अध्यात्मिकतेचे आणि नैतिकतेचे अधिष्ठान असावे असा त्यांचा आग्रह होता. आजच्या परिस्थितीत समर्थ रामदासांचे संघटन विषयक, राजकीय विषयक, व्यवस्थापन विषयक विचार मार्गदर्शक आहेत तसेच कालसुसंगत आहेत असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेन्द्र डोळके यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. भाऊजी दप्तरींच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे होते. कार्यक्रमाचे संचालन मेघा देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथालय संचालक प्राध्यापक विवेक अलोणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय सहायक माधुरी वाडीभस्मे आणि डॉ. मोनाली पोफरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला भाऊजी दप्तरी यांचे कुटुंबीय आणि ओते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.