- ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्यात
- यावर्षीची थीम - कौशल्य आणि तंत्रज्ञानाद्वारे समृद्ध शेती
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या २४ नोव्हेंबर पासून दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर सुरू होत आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, एकदिवसीय परिषदा असे स्वरूप असणाऱ्या ॲग्रोव्हिजनची तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. यावेळी बुटीबोरीमध्ये मदर डेअरीच्या ५०० कोटी रुपयांच्या मेगा प्लांटचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. भविष्यात हा प्लांट दररोज १० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करू शकणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनाकडे प्रोत्साहित करून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ५ हजार शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सदस्य सुधीर दिवे यांनी दिली.
आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ॲग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सदस्य सुधीर दिवे, आयोजन सचिव रवी बोरटकर, सचिव रमेश मानकर यांच्यासह समितीतील अन्य सदस्य उपस्थित होते. शेतकरी, उत्पादक, ग्राहक, कृषी विद्यार्थी आणि कृषीप्रेमी अशा प्रत्येकाने या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी तसेच शेतकऱ्यांनी कार्यशाळा व परिषदांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ. सी.डी. मायी यांनी केले.
बुटीबोरीत मदर डेअरीच्या ५०० कोटी रुपयांच्या मेगा प्लांट
ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन दिनाच्या दिवशी संपूर्ण विदर्भाला एक नवे बक्षीस मिळणार आहे. बुटीबोरी फेज २ येथे २४ नोव्हेंबर रोजी मदर डेअरीच्या ५०० कोटी रुपयांच्या मेगा प्लांटचे देखील उद्घाटन होणार आहे. मदर डेअरीने एमआयडीसीकडून २५ एकर जागा विकत घेतली असून वर्षभरात हा मेगा प्लांट तयार होणार आहे. हा प्लांट दररोज १० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करू शकणार आहे. यानंतर मदर डेअरी विदर्भाला सेंटर मानून सर्वठिकाणी त्यांची उत्पादने पाठवणार आहे. महत्वाचे म्हणजे देशभरातील जवळपास ५ हजार दूध उत्पादक या उद्घाटन समारंभ आणि परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सदस्य सुधीर दिवे यांनी दिली.
गुजरातचे राज्यपाल करणार ॲग्रोव्हिजन २०२३ चे उद्घाटन
ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरूवात होईल. ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेतील उद्घाटन सोहळ्याला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत उद्घाटक म्हणून तर केंद्रिय मंत्री दुग्ध, मत्स व्यवसाय व पशुसंवर्धन परषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री, महाराष्ट्र, धनंजय मुंडे, कृषी मंत्री, महाराष्ट्र व डॉ. मीनेश शहा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ उपस्थित राहतील.
शेतकरी, शेती तज्ज्ञ, कृषी प्रेमी अशा एकूणच मांदियाळीसाठी १०,८०० चौरस मीटर जागेवर प्रदर्शनाचे डोम, मोठ्या उपकरणांसाठी ४५०० चौरस मीटरचे ओपन हँगर उभारण्यात आले असून कार्यशाळांसाठी तीन हॉल्स, उद्द्घाटनासाठी व परिषदेसाठी खास डोम असा एकंदर १३,००० चौरस मीटर परिसर प्रदर्शनाने व्याप्त आहे. शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीसाठी ३ काउंटर्स तयार करण्यात आले आहेत.
पीडीकेव्ही, दाभा मैदानावर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू होत असलेल्या ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सुमारे ४२५ स्टॉल्स कृषी प्रदर्शनात असतील. शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते, कृषी विषयक उपकरणे, आधुनिक कृषी उपकरणांची माहिती देणारे स्टॉल्स, नाबार्डसह एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, येस बैंक, इंडियन बँक या बँक्स आणि कृषी विषयक सरकारी विभागांचा ॲग्रोव्हिजनमध्ये समावेश असणार आहे. यावर्षी युपीएल, ई-व्हर्स. एआय, जेसीबी, सल्फर मिल्स, पतंजली, पीआय इंडस्ट्रिज, महिको, आयटीसी, अंकुर सिड्स, घारडा केमिकल्स, इंडियन इन्म्युनॉलॉजिकल्स लि., रासी सिड्स, व्ही.एच. ग्रुप, पारिजात इंडस्ट्रिज, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन, कुबोटा, टॅफे अशा अनेक मोठ्या संस्थांनी प्रदर्शनात आपला सहभाग निश्चित केला आहे. याशिवाय गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांनीही आपला सहभाग निश्चित केला आहे.
३१ विविध विषयांवर भरणार कार्यशाळा
या वर्षी ॲग्रोव्हिजन परिषदामंध्ये ३१ विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. यातील काही कार्यशाळा या जास्त कालावधीच्या असतील, कृषी क्षेत्रात ड्रोनचा उपयोग, फुलशेती, भाजीपाला बियाणे उत्पादन, हळद आणि आलं लागवड आणि प्रक्रिया, बांबू लागवड, औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, कृषी रसायनांचा योग्य वापर, व्हर्टीकल फार्मीग, रेशीम शेती, शेळी-मेंढी पालन, मधमाशी पालन, सेंद्रिय शेती, विदर्भातील ॲग्रोटुरिझमच्या संधी, विदर्भातील कुक्कुटपालन, उत्पादन संधी आणि आव्हाने अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
यावर्षी ॲग्रोव्हिजनमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग: संधी व आव्हाने या विषयांवर २ दिवसाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या एलआयटी अल्युमिनी असोसिएशनच्या सहयोगाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शिवाय यावर्षी ॲग्रोव्हिजनमध्ये काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विदर्भात डेअरीचा विकास २४ नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा २५ नोव्हेंबर रोजी, संत्रा लागवड व निर्यात संधी २६ नोव्हेंबरला, एफपीओ फॉर्मेशन मार्गदर्शन कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता, महिला बचतगट मेळावा २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता, विदर्भात गोड्या पाण्यातील मत्सव्यवसायाच्या संधी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.