राष्ट्रपतींनी बदमपहार रेल्वे स्थानकावरून दाखवला ३ नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा

    21-Nov-2023
Total Views |
  • रायरंगपूर येथील नवीन टपाल विभागाचे केले उद्‌घाटन
rashtrapati-inaugurates-new-trains-badampahar - Abhijeet Bharat
 
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ओडिशामधील बदमपहार रेल्वे स्थानकावरून तीन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. बदमपहार – टाटानगर मेमू, बदमपहार – रुरकेला साप्ताहिक एक्सप्रेस, आणि बदमपहार - शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस या गाड्यांचा यात समावेश आहे. त्यांनी यावेळी रायरंगपूर येथील नवीन टपाल विभागाचे उद्घाटन केले, तसेच त्याच्या स्मरणार्थ रायरंगपूर टपाल विभागाचे विशेष टपाल पाकीट प्रकाशित केले आणि बदमपहार रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.
 
 
यावेळी आयोजित समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एखाद्या प्रदेशाचा विकास हा तेथील दळणवळणाच्या सुविधांवर अवलंबून असतो. मग रेल्वे असो, अथवा टपाल सेवा, या सर्व सेवा लोकांचे जीवन सुकर करतात. त्या म्हणाल्या की, आज सुरू झालेल्या तीन गाड्या स्थानिक जनतेला झारखंड आणि पश्चिम बंगालसारख्या शेजारच्या राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी उपयोगी ठरतील. त्यांनी सांगितले की, यामुळे ओदिशामधील रुरकेला या औद्योगिक शहराला भेट देणाऱ्या लोकांची गैरसोयही होणार नाही.
 
राष्ट्रपती म्हणाल्या की, सेल फोन आणि कुरिअर सेवांचा वाढता वापर असूनही, भारतीय टपाल विभागाने आपली काल-सुसंगतता गमावलेली नाही. रायरंगपूर येथील नवीन टपाल विभाग या प्रदेशासाठी महत्वाचा ठरेल. या भागातील लोकांना आता टपाल सेवा सहज उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
केंद्र सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे, असे सांगत, 2013-14 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत चालू अर्थसंकल्पात जवळजवळ तिप्पट वाढ झाल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. त्या म्हणाल्या की, आदिवासींच्या विकासाशिवाय सर्वसमावेशक विकास अपूर्ण आहे, आणि त्यासाठी सरकार आदिवासी समाजाच्या विकासाला प्राधान्य देत आहे. आदिवासी युवकांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वतःचा विकास साधायचा असेल, तर प्रयत्न आवश्यक आहेत, आणि म्हणूनच युवकांनी जीवनात पुढे जायचा सातात्त्याने प्रयत्न करायला हवा, असे राष्ट्रपतींनी सांगितले.