- अंबाझरी तलाव, फुटाळा तलाव आणि गोरेवाडा येथे व्यवस्था
नागपूर : उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविण्यात येतात व सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात येते. यावर्षी १९ आणि २० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवानिमित्त धरमपेठ झोन येथील अंबाझरी तलाव, फुटाळा तलाव आणि पिवळी नदीचे उगमस्थान गोरेवाडा परिसरात नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी व संपूर्ण झोन टीम भाविकांच्या सुविधांच्या दृष्टीने कार्यरत आहेत.
अंबाझरी तलाव व तेथील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे. भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी तलावापर्यंत येण्यासाठी मार्ग सुशोभित करून सुरक्षेसाठी कठडे लावण्यात आले आहे. तसेच सर्वत्र बर्रीकॅडींग, विद्युत व्यवस्था, साऊंड ची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पूजा स्थळी उभे राहण्यासाठी स्टॅन्ड उभारण्यात आले असून तलावाच्या काठावर कपडे बदलण्याची तात्पुरती खोली बनविण्यात आली आहे. पायऱ्यांवर, तलावाच्या काठावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तलाव परिसरात कुठेही अंधार राहू नये यासाठी ठिकठिकाणी विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. तलावावर होणारी गर्दी लक्षात घेता अंबाझरी तलाव, अंबाझरी उद्यान, स्वामी विवेकानंद स्मारकाजवळून व अंबाझरी मेट्रो स्टेशन अशा तीन ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात आले. भाविकांच्या गाडी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नागपूर शहरात साजरे होणारे प्रत्येक उत्सव हर्षोल्हासात आणि शांततेत साजरे व्हावे, भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिका संपूर्ण प्रयत्न करत असते.