बल्लारपूर बायपास अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० लाखांची मदत

    19-Nov-2023
Total Views |
 
ballarpur-bypass-tragedy-assistance - Abhijeet Bharat
 
चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघात होऊन मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. प्रत्येकी पाच लाख रुपयांप्रमाणे एकूण २० लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.
 
२७ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अपघातात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) यांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांनी पालकमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली होती. प्रस्ताव पाठविल्यानंतर २० दिवसांच्या आत मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मंजूर केले.