शेगाव : शेगाव शहरातून अत्यंत धक्कादायक आणि निर्दयीपणाची हद्द पार करणारी घटना उघडकीस आली आहे. एका निर्दयी आईने आपल्या एक दिवसाच्या पोटच्या जिवंत बाळाला शेगावमधील एक उच्चभ्रू वस्तीमध्ये फेकून दिले. महत्वाचे म्हणजे या एक दिवसाच्या नवजात बाळाचा एक पाय कापलेल्या स्थितीत दिसून आला. या घटनेमुळे शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आईपणाला काळिमा फासणारी ही घटना उघड होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शेगाव शहरातील रेल्वे रुळाला लागून असलेल्या लखपती गल्ली परिसरात रस्त्याच्या कडेला नागरिकांना स्त्री जातीचे अर्भक पडलेले दिसून आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतक नवजात अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेतला. लक्षवेधी म्हणजे या एक दिवसीय अभर्काचा एक पाय कापलेल्या स्थितीत दिसून आला. आईने आपल्या अर्भकाला रात्री फेकून दिल्यानंतर कुत्र्यांनी त्याचा पाय खाल्ला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच अनैतिक संबंधातून हेबाळ जन्माला आल्याने त्यास निर्जनस्थळी फेकून दिले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त करत केला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून या संदर्भात कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या ०७२६५ २५२०१० या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले आहे.