- अमेरिकन विद्यापीठांमधील नामवंत शिक्षणतज्ज्ञांशी गोलमेज चर्चा आणि आयसीएआयच्या सदस्यांशी संवाद
- मायक्रोन टेक्नॉलॉजी आणि युट्युबच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही चर्चा
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक आणि भारतीय वंशाच्या उद्यम भांडवलदारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताला गुंतवणुकीचे उत्तम स्थान बनवण्यासाठी त्यांच्या कल्पना सामायिक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले.
केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी भारतीय स्टार्टअप कार्यक्षेत्राबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मांडला. कृत्रिम बुद्धिमतेसारख्या महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्या भारतातील तरुण प्रतिभेला हातभार लावण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित उद्योजक आणि उद्यम भांडवलदारांना केले.
त्यानंतर, गोयल यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील नामवंत शिक्षणतज्ज्ञांसह गोलमेज चर्चेत भाग घेतला, यात स्टॅनफोर्ड, यूसी बर्कले, फ्रेस्नो स्टेट, यूसी सांताक्रूझ, यूसी डेव्हिस आणि सिलिकॉन आंध्र विद्यापीठासह विविध विद्यापीठांच्या सदस्यांनी विविध जागतिक समस्यांवर चर्चा केली. विदेशी विद्यापीठे, स्टॅनफर्ड सारख्या संस्थांसोबत भारत कशाप्रकारे सहकार्य करू शकतो आणि संयुक्त-विद्यापीठ क्षेत्र कशाप्रकारे स्थापन करू शकतो यावर या गोलमेज परिषदेत सक्रिय विचारविनिमय झाला.
भारतीय सनदी लेखापाल संस्था (आयसीएआय I) सॅन फ्रान्सिस्को विभागाने आयोजित केलेल्या 'नव्या क्षितिजांकडे झेप : अमेरिका - भारत सहकार्यामध्ये सनदी लेखापालांची उत्प्रेरकांची भूमिका' या विषयावरील कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात आयसीएआयच्या सदस्यांसोबत संवादात्मक सत्राचा समावेश होता. यात केंद्रीय मंत्री गोयल यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी सनदी लेखापाल कशाप्रकारे भूमिका बजावू शकतात यावर भर दिला.
दिवसाच्या उत्तरार्धात गोयल यांनी मायक्रोन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा आणि यूट्यूब इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. या द्विपक्षीय बैठकांचा एक भाग म्हणून, गोयल यांनी या कंपन्यांच्या भारतातील उपस्थितीच्या संदर्भात चर्चा केली आणि भारतीय बाजारपेठांमध्ये त्यांच्या विस्तारासाठी पाठिंबा दिला. मायक्रॉनसोबतच्या चर्चेत, गोयल यांनी भारतातील वाढते सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र कंपन्यांना सहयोग आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या मोठ्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देते यावर प्रकाश टाकला. नील मोहन यांच्याशी चर्चा करताना, गोयल यांनी भरभराट होत असलेल्या डिजिटल कार्यक्षेत्रामध्ये, आशयाचे वाढते अवकाश तसेच तरुण आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्येमध्ये भारताची क्षमता कशी आहे यावर भर दिला.
आपल्या व्यस्त दिवसाची सांगता करताना केंद्रीय मंत्री गोयल, आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य (एपीइसी) आणि भारतासह अतिथी अर्थव्यवस्थांच्या नेत्यांच्या स्वागत समारंभात सहभागी झाले. या स्वागत समारंभाचे आयोजन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि प्रथम महिला जिल बायडेन यांनी केले होते. एपीईसी सदस्य देशांमध्ये ऑस्ट्रेलिया; ब्रुनेई दारुसलाम; कॅनडा; चिली; चीन प्रजासत्ताक; हाँगकाँग, चीन; इंडोनेशिया; जपान; कोरिया प्रजासत्ताक; मलेशिया; मेक्सिको; न्युझीलँड; पापुआ न्यू गिनी; पेरू; फिलीपिन्स; रशियन महासंघ; सिंगापूर; चीनी तैपेई; थायलंड; अमेरिका; आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.