Nagpur : दिवाळीच्या दोन दिवसात 2768.13 टन कचरा संकलित

    16-Nov-2023
Total Views |
  • शहर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी तैनात
nagpur-diwali-waste-collection - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी आणि स्मार्ट स्वच्छता चमुच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावत दोन दिवसात मनपाच्या दहाही झोन निहाय 2768.13 टन कचरा संकलित केला.
 
रविवारी 12 नोव्हेंबर आणि सोमवार 13 नोव्हेंबर रोजी अर्थात लक्ष्मीपूजन आणि दुसऱ्या दिवशी इतक्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला. दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात फटाकेही वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कचऱ्यात नेहमीपेक्षा अधिक भर पडल्याचे निदर्शनास येते. यादृष्टीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील विविध मार्गांवर फटाक्यांचा कचरा जमा होऊ नये याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशनुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले आणि चमू यांनी मनपाचे सर्वच स्वच्छता कर्मचारी आणि स्मार्ट स्वच्छता चमू तैनात केले होते.
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येत असल्याने सगळीकडच्या बाजारपेठा व दुकाने गजबजून गेलेली दिसतात. यामुळे नेहमी पेक्षा कचऱ्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ‍दिसून येते. या अनुषंगाने नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी तत्पर मनपाचे स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी आणि अधिकारी यांनी दोन दिवसात हा कचरा संकलित केला आहे.
 
दिवाळीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय स्वच्छता कर्मचाऱ्यांची आणि स्मार्ट स्वच्छता चमुची तैनाती करण्यात आली होती. या सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित स्वच्छतेचे कार्य करीत शहराला स्वच्छ साकारण्यात हातभार लावला आणि स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी केली.