- विविध आरोग्य केंद्रांमध्ये आयोजन : एचडीएफसी बँक व अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागपूर शहरातील विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात एचडीएफसी बँक व अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी खामला येथील मनपा डिस्पेंसरी येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय १८ नोव्हेंबर रोजी स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र येथे, २० नोव्हेंबर रोजी कमाल चौक येथील पाचपावली स्त्री रुग्णालय येथे, २१ नोव्हेंबर रोजी चंद्रमणी नगर येथील नवकर बुद्ध विहार येथे, २२ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर येथे, २३ नोव्हेंबर रोजी लुंबीनी बुद्ध विहार पंचवटी नगर येथे, २४ नोव्हेंबर रोजी मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे, २८ नोव्हेंबर रोजी छावनी सदर येथे स्थित मनपा मंगळवारी झोन कार्यालयामध्ये, २९ नोव्हेंबर रोजी भवानी माता मंदिर परिसर पारडी येथे आणि ३० नोव्हेंबर रोजी नेहरूनगर झोन कार्यालय येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रक्तदान शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील.
नागरिकांनी आपल्या नजीकच्या रक्तदान शिबिर स्थळी भेट देउन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.