भारतात चालू असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेतील सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. अपेक्षेप्रमाणे यजमान भारताने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सर्वात आधी उपांत्य फेरी गाठली. भारताने खेळलेल्या सर्वच सर्व सामन्यात विजय मिळवत गुण तालीक्यात प्रथम क्रमांक पटकावत सर्वात आधी उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले. भारता प्रमाणेच दक्षिण आफ्रिकेने देखील चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. पाच वेळेचा विजेत्या ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन गमावले. नंतर मात्र सलग सात सामने जिंकत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीचा चौथा संघ कोण हे पाहण्यासाठी मात्र क्रिकेटप्रेमींना धीर धरावा लागला. कारण न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे तीन संघ त्या शर्यतीत होते. अखेर न्यूझीलंडने ही शर्यत जिंकली आणि उपांत्य फेरी गाठली.
आता १५ तारखेला भारताचा आणि न्यूझीलंडचा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगेल, तर १६ तारखेला दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना कोलकोत्याच्या इडन गार्डन मैदानावर होईल. दोन्ही सामन्यातील विजेते १९ तारखेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्व विजयासाठी समोरासमोर येतील. भारताने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेतील एकमेव अजिंक्य संघ भारत आहे. या स्पर्धेत एकाही संघाला भारताला नमवण्यात यश आले नाही. विशेष म्हणजे भारताने जिंकलेले सर्वच्या सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. प्रतिस्पर्धी संघाला भारताने जराही संधी दिली नाही. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारताने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. भारताचे सर्व फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहे. रोहित, विराट, गील, श्रेयस, राहुल सर्वांनीच धावा काढल्या आहेत. सूर्यकुमार यादवला मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी तो कधीही मॅच विनिंग खेळी करू शकतो.
भारताचे गोलंदाज तर स्वप्नवत कामगिरी करत आहे. भारताचे सर्वच गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणत आहेत. बुमाराह, शमी, सिराज, जडेजा, कुलदीप यादव या भारताच्या पाच पांडवांनी या स्पर्धेत जी कामगिरी केली आहे तशी कामगिरी याआधी भारताच्या कोणत्याही गोलंदाजांनी केलेली नाही. एकाच वेळी भारताच्या सर्व गोलंदाजांमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा लागली आहे. विशेष म्हणजे यात सर्वच गोलंदाज यशस्वी होत आहे. एकाच स्पर्धेत सर्वचे सर्व गोलंदाज भेदक गोलंदाजी करत असल्याचे चित्र प्रथमच पाहायला मिळत आहे. असे म्हणतात की फलंदाज सामना जिंकून देतात तर गोलंदाज स्पर्धा. भारताने या स्पर्धेवर जे एकहाती वर्चस्व गाजवले आहे ते गोलंदाजांमुळेच. गोलंदाजांचा हाच फॉर्म उपांत्य आणि अंतिम फेरीत कायम राहिला तर भारत या विश्वचषकाचा मानकरी ठरेल यात शंका नाही. अर्थात भारत फॉर्मात असला तरी बेसावध राहणार नाही. कारण उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला न्युझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेत जरी भारताने न्यूझीलंडवर मात केली असली तरी हा संघ भारताला नेहमीच जड गेला आहे. विशेषतः नॉक आऊट सामन्यात या संघाने भारताला कायम हरवले आहे.
मागील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताची गाठ न्युझीलंडशीच पडली होती आणि न्यूझीलंडने भारताला स्पर्धेबाहेर ढकलले होते. विश्व टेस्ट चॅम्पियनच्या अंतिम फेरीतही न्यूझीलंडने भारताला हरवले होते त्यामुळे भारत न्यूझीलंडला हलक्यात घेणार नाही एकमात्र खरे की जर भारताने आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर भारत न्यूझीलंडला सहज हरवून अंतिम फेरी गाठू शकतो. दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेशी झुंजावे लागेल. अर्थात ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म, अनुभव आणि दक्षिण आफ्रिकेची ऐनवेळी कच खाण्याची वृत्ती पाहता ते दक्षिण अफ्रिकेला मात देऊन अंतिम फेरीत पोहोचू शकतात. तसे झाले तर १९ तारखेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रंगू शकतो. सध्या तरी हीच शक्यता अधिक दिसते. एकूणच विश्व विजया पासून भारत अवघे दोन पावले दूर आहे. जर खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला आणि नशिबाने साथ दिली तर ही दोन पावले पार करून भारत १२ वर्षाने विश्वचषकावर नाव कोरु शकतो आणि १४० कोटी जनतेचे स्वप्न साकार करू शकतो. भारतीय संघाला उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी शुभेच्छा!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.