हैदराबादमधील एका गोडाऊनला भीषण आग; ६ लोकांचा मृत्यू

    13-Nov-2023
Total Views |
 
hyderabad-apartment-fire-tragedy-nampally - Abhijeet Bharat
 
हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. हैदराबादमधील नामपल्ली येथील बाजारघाट येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आली आहे. ही आग इतक्या वेगाने पसरली की काही कळण्याच्या आधीच येथील लोक आगीचयक भक्षस्थानी सापडले होते. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 
 
 
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याअपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर एक गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये एका कारची दुरुस्ती सुरु होती. त्यावेळी गोडाऊनमध्ये ठेवलेल्या अनेक प्रकारच्या रसायनामध्ये ठिणगी पडली आणि ही आग लागली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. काही वेळातच आग संपूर्ण खोलीत आणि अपार्टमेंटमध्ये पसरली. यामुळे सहा जणांना जीव गमवावा लागला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या घटनेची माहिती देताना हैदराबाद सेंट्रल झोनचे पोलीस उपयुक्त व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले की, हा अपघात हैदराबादच्या नामपल्लीच्या बाजारघाट येथे घडला. येथे अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गोडाऊनला आग लागली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.
 
 
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आगीच्या घटनास्थळी ठिकाणी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, तेलंगणा सरकार अशा प्रकरणांमध्ये कारवाई करत नाही. मी राज्य सरकारला अशी गोडाऊन शहराबाहेर हलवण्याची वारंवार विनंती केली आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मी पंतप्रधानांशी बोलेन.
 
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी नामपल्ली आगीच्या घटनेत झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.