उपद्रव शोध पथकाची मोहीम सुरूच; अस्वच्छता पसरविणाऱ्या ३७,२३८ जणांवर कारवाई

    31-Oct-2023
Total Views |
 
nagpur-municipal-authorities-crack-down-on-littering - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका पूर्णतः कार्यरत आहेत. त्याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून परिसराचे विद्रुपीकरण करीत उपद्रव पसरविणाऱ्यांविरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारा कठोर पाऊल उचलल्या जात आहे.
 
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात, शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे.
 
गतवर्ष ११ ऑक्टोबर २०२२ ते ३० ऑक्टोबर २०२३ दरम्यान उपद्रव शोध पथकाच्या जवानांद्वारे रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर, सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विसर्जन करणाऱ्यांवर, हातगाड्या, स्टॉल, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता, कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे, मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे, चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे, वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे, या व्यतिरिक्त व्यक्तिविरुध्द व संस्थांविरुद्ध अशा विविध ३७ हजार २३८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ३० ऑक्टोबर पर्यंत रुपये २,०५,७५,४०० रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत.
 
नागपूर शहराला राहणीमानाच्या दृष्टीने उत्तम शहर साकारण्यासाठी महानगरपालिका कार्यरत आहे. नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी मनपाद्वारे विशेष पाऊल उचलल्या जात आहेत. विविध उपाय योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न मनपाचा आहे. असे असताना शहरात अस्वच्छता पसरवून परिसर घाण करणाऱ्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जात आहे.