अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अनेक लोकांचे समर्थन मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
राज्यातील शिंदे सरकार हे मराठा आरक्षण देण्याबाबत गंभीर आहे. त्यांना समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करायचे आहे. त्यामुळे मी मनोज जरांगेंना विनंती करते की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत आवाहनही केले आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मानसिकता स्पष्ट आहे की समाजातला कुठलाही घटक वंचित राहू नये. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. एक खासदार म्हणून माझा त्यांना पाठिंबा आहे. मी त्यांचे व्हिडिओ पाहिले, सहा दिवसांपासून ते उपोषण करत आहेत आहेत त्यांचा आवाज खोल गेला आहे.त्यांच्या सोबत आम्ही सर्व आहोत असेही त्या म्हणालात.