- शिवाजी पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाचे उपोषण
नागपूर : मराठा आरक्षणवरून राज्यात सध्या हिंसक आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी जाळपोळच्या घटना घडत आहेत. अशातच उपराजधानी नागपुरात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नागपुरात महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं', 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', 'जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देत नागपुरात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी समाजाचे पदाधिकारी प्रकाश खंडागे यांनी सांगितले, आमचे आंदोलन साखळी उपोषण राहणार असून जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याच्या वेळ दिला होता. त्यामुळे आता वेळ देऊनही सरकार काही करणार नाही. जो पर्यंत मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू असा इशारा यावेळी दिला.
उपोषणाबाबत माहिती देताना कार्यकर्ता अमोल माने म्हणाले की, जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढत नाही, तोपर्यंत आम्ही जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नागपुरात साखळी उपोषण सुरु ठेऊ. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय होईल याच्याशी आम्हला काहीही करायचे नाही. आम्हाला आमच्या मराठा आरक्षणाचा अध्यादेश हवा आहे. सरकारला मराठा समाजाबद्दल आत्मीयता असेल तर सरकार नक्कीच मराठा समाजाला आरक्षण देईल, असेही ते म्हणाले.