बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून बस आणि घरे देखील फोडल्यात आली आली. अशातच बीड जिल्ह्यात या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. सोमवारी 30 ऑक्टोंबर रोजी ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आणि सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर हद्दीपर्यंत, तसेच सर्व महामार्गावर अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या की, सध्या परिस्थिती शांततापूर्ण आहे. काल रात्रीपासून येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. हिंसाचारामुळे सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद आहेत. सध्या येथे इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील शांतता भंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, आतापर्यंत ४० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून काल रात्रीच्या हिंसाचारानंतर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांची पथके विविध भागात गस्त घालत आहेत. सध्या जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनारम्यान हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यादरम्यान आंदोलकांनी तीन आमदारांची घरे आणि कार्यालये पेटवून दिली. सोमवारी रात्री हिंसाचार वाढल्यानंतर मोठ्या जमावाला रोखण्यासाठी बीडमधील अनेक भागात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.