नागपूर : समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचे व्यक्तिमत्व, मूल्ये, संघर्ष, बु्द्धीमत्ता आणि त्याचा समाजमनावर पडलेला प्रभाव टेडएक्स सिव्हिल लाईन्स विमेन या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकट झाला आणि महिला शक्तीचा जागर करण्यात आला.
टेडएक्स सिव्हील लाईन्स विमेनच्या डॉ. मृणाल नाईक यांना लायसन्स प्राप्त झाले असून त्यांनी ‘द पॉवर ऑफ इंटरजनरेशनल विसडम: लर्निंग फ्रॉम विमेन्स एक्सपीरियन्स’ विषयावर जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींगच्या हिंगणा रोड येथील परिसरातील जी21 हॉलमध्ये टेडएक्स टॉकचे आयोजन केले होते. यात आर्ट हिस्टॉरियन व क्युरेटर डॉ. अल्का पांडे, सामाजिक कार्यकर्ता अर्चना साठे-दास, सामाजिक कार्यकर्ता पारोमिता गोस्वामी, समुपदेशक व मोटीव्हेशन स्पीकर डॉ. रोझिना राणा, सामाजिक कार्यकर्ता जिज्ञासा चवंढाल, कवयित्री, चित्रकार व शिक्षिका मिली पांडे विकमसी व सोशल कंटेंट क्रियेटर व इन्फुएन्सर नेहा ठोंबरे यांनी सहभाग नोंदवला. समाजाचा दृष्टीकोन बदलणाऱ्या या सर्व महिला होत्या.
टेडएक्स स्थानिक व्यक्ती, समुदाय, संस्थांना जोडणारे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असून यात समाजाच्या विविध स्तरावरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचे जीवन, अनुभव, कार्य यांची ओळख करून दिली जाते. टेडएक्स सिव्हील लाईन्स विमेनद्वारे समाजाचा दृष्टीकोन बदलणाऱ्या महिलांचा समावेश होता.
डॉ. अल्का पांडे यांनी भारतीय प्राचीन दृश्यकलांमधे प्रदर्शित करण्यात आलेल्या महिलांच्या लैंगिकतेवर भाष्य केले तर अर्चना दास यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करीत दृढ निश्चय व आत्मविश्वासाने कर्करोगग्रस्तांसाठी कार्य करण्यापर्यंत प्रवास उलगडला. पारोमिता गोस्वामी यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या समान हक्कासाठीचा त्यांनी दिलेला लढा उलगडला तर डॉ. रोझिना राणा यांनी मुलीच्या अपघाती निधनानंतर आलेल्या नैराश्यातून स्वत:ला बाहेर काढत आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धांमध्ये मिळालेल्या यशाची कहाणी सांगितली तर जिज्ञासा चवंढाल या अंध महिलेने अपंगत्वावर मात करत इतर अंध व्यक्तीच्या शिक्षण, रोजगारासाठी केलेल्या कार्याची माहिती उलगडली. मिली पांडे विकमसी यांनी शिक्षणातील कलात्मकता व सृजनशिलतेचे महत्व उलगडले आणि नेहा ठोंबरे या युवतीने गावापासून ते राज्यापर्यंतचा तिच्या सक्षमीकरणाचा इतिहास उलगडला.
सदाबाई रायसोनी विमेंस कॉलेजच्या प्राचार्य सौ अमिना वली यांनी टेडएक्सबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेडएक्स सिव्हील लाईन्स विमेन च्या लायसेन्सी डॉ. मृणाल नाईक यांनी केले. सौ शोभा रायसोनी यांनी सहआयोजक या नात्याने कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.