- ‘जय जय गौरीशंकर’ नाटयगीतांची मैफल रंगली
नागपूर : ‘सप्तसुर झंकारीत बोले गिरिजेची वीणा’ या नांदी ने नाट्य संगीताच्या परंपरेनुसार कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि पहिल्याच श्रवणीय सादरीकरणाने श्रोत्यांवर मोहिनी घातली. सुप्रसिद्ध गायक अनिरुध्द देशपांडे आणि युवा गायक ऋषिकेश करमरकर यांनी सुरेल सुरुवात करून श्रोत्यांना आश्वस्त केले.
यंदाचे वर्ष हे ज्येष्ठ नाटककार, पत्रकार, माजी खासदार, विदर्भपुत्र स्व. विद्याधर गोखले यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. विद्याधर गोखले रचित गाजलेल्या नाट्य गीतांचा 'जय जय गौरीशंकर' हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात सादर करण्यात आला.
जयोस्तुते हे उषा देवेते, निराकार, जय गंगे भागीरथी ही अजरामर नाट्य संगीतातील गाणी अनिरुद्ध देशपांडे यांनी; रागिणी मुखचंद्रमा, जय शंकर गंगाधरा, रातीहून सुंदर अश्या एका पेक्षा एक गीतांचे सादरीकरण ऋषिकेश करमरकर यांनी उत्तमरित्या केले. मंजिरी वैद्य यांनी सोहम हर डमरू, ऋतुराज आज, अंग अंग तव, रे तुझ्या वाचून सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, स्वरसम्राज्ञी, सुवर्णतुला या दर्जेदार संगीत नाटकांमधील लोकप्रिय नाट्यगीते या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करण्यात आली. सर्व गीतांना संवादिनीवर श्रीकांत पिसे आणि तबल्यावर डॉ. राजेंद्र डोळके यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. विवेक अलोणी यांनी केले. नाट्य संगीत प्रेमींनी कार्यक्रमाला मोठया संख्येने हजेरी लावली.
सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष प्रभुजी देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्र के हित मे समाज, समाज के हित मे ज्येष्ठ आणि ज्येष्ठ के हित मे परिवार ही मंडळाची संकल्पना असल्याचे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव अविनाश तेलंग यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली आणि महामंडळाने हाती घेतलेले उपक्रम सांगितले. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सचिव विलास मानेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.