मानवाच्या निर्मितीने मानवच संकटात : पद्मभूषण विजय भटकर

    30-Oct-2023
Total Views |
  • पत्रभेट दिवाळी अंकाचे प्रकाशन
impact-of-technology-on-human-life - Abhijeet Bharat
 
नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक क्षेत्रात होणारी अविश्रांत प्रगती यामुळे आता मानव यंत्राच्या हाताखाली काम करतील का? मानवाची गरजच राहणार नाही का? असे प्रश्न उभे झाल्या ने मानवाच्या निर्मितीने मानवच संकटात आला आहे, असे प्रतिपादन पद्मभूषण विजय भटकर यांनी केले. पत्रभेट दिवाळी अंक-2023 चा प्रकाशन सोहळा आज आयोजित करण्यात आला त्यावेळी प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. प.पू. श्री सद्गुरुदास महाराज यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अतिथी म्हणून छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि व्ही स्क्वेअर सिस्टमचे अजेय देशमुख, पत्रभेट दिवाळी अंकाचे संपादक अमर देशपांडे यांची उपस्थिती होती. पत्रभेटचे संपादक मंडळ व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
 
भटकर पुढे म्हणाले की, मानवाला पूरक असे तंत्रज्ञान तयार करायचे हेच ध्येय असायला हवे. तंत्रज्ञान मातृभाषेत शिकवता येईल का या बद्दल संशोधन व्हावे. येणारा काळ कसा असेल त्यादृष्टीने मानवाने आध्यात्मिक बाजू कायम ठेवून विवेक आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालावी असे ते म्हणाले. अध्यात्म आपल्याला चांगले संशोधन करण्यास मार्गदर्शन करू शकते असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. संगणकाचा उपयोग अध्यात्म आणि मार्गदर्शनासाठी व्हावा, ज्ञानाचा प्रसार त्या माध्यमाने व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
पत्रभेट दिवाळी अंकाचे संपादक अमर देशपांडे यांनी सद्गुरू महाराज यांचे तर अजेय देशमुख यांनी विजय भटकर यांचे स्वागत पूजन केले. अजेय देशमुख यांनी सुरवतीला विजय भटकर यांचा अल्प परिचय करून दिला. भारतात कलर टीव्ही येणे, सुपर कम्प्युटर, सी डॅक कोर्सचे प्रणेते आणि असे बरेच अतुलनीय योगदान विजय भटकर यांचे आहे असे ते म्हणाले. अतिशय दूरदृष्टि असेलेले वैज्ञानिक असे त्यांनी भटकर यांना संबोधिले. संपूर्ण आयटी समुदायाच्या वतीने त्यांनी भटकर यांचे आभार मानले. पत्रभेट दिवाळी अंकाचे संपादक अमर देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय देशकर यांनी केले. यावेळी त्यांनी गुरुमंदिराच्या कार्याची माहिती दिली.
 
विजय भटकर हे विज्ञान ऋषि - सद्गुरूदास महाराज
 
विजय भटकर हे विज्ञान ऋषि असल्याचे सांगत मानव निर्मित धोकयांचा आढावा त्यांनी घेतला. यंत्र तंत्र आले तरीही मंत्र तितकेच महत्वाचे आहे असे ते म्हणाले. मानवाचा विवेक जागृत आहे तो पर्यन्त यांत्रिक युग अधिक प्रभावी होऊ शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विज्ञानाशी मैत्री करून विवेक जागृत ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला.