वि. सा. संघाच्या लोकसंस्कृती जागर स्पर्धेत हिंदू मुलींची शाळा प्रथम

    30-Oct-2023
Total Views |
 
hindu-girls-school-wins-lokgeet-competition - Abhijeet Bharat
 
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या जनहितकारी उपक्रमांचा भाग म्हणून आयोजित हौशी कलावंताच्या समूह लोकगीत जागर स्पर्धेत हिंदू मुलींच्या शाळेच्या चमूने प्रथम स्थान पटकाविले. दुसरे व तिसरे स्थान अनुक्रमे संस्कार विद्यासागर व श्री वरद समूह लक्ष्मीनगर यांनी मिळविले. स्पर्धेतील उत्तेजनार्थ गटात राजेंद्र हायस्कूल नं.2 व आराध्या समूहाने स्थान मिळविले.
 
विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात रविवारी हा कार्यक्रम झाला. विजेत्या स्पर्धकांना वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, विलास मानेकर, डॉ. राजेंद्र डोळके, डॉ. रवींद्र शोभणे, परीक्षक किरण संगवई, भाग्यश्री बारस्कर व राम भाकरे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी संयोगीता धनवटे यांचीही उपस्थिती होती. स्पर्धेत विविध चमूंनी आणि पथकांनी सादर केलेली गीते आणि नृत्यांनी उपस्थित रसिकांपुढे लोकसंस्कृतीचा जागर करण्यात आला.
 
या स्पर्धेचा प्रारंभ लक्ष्मीनगरातील वरद ग्रुपने ‘नदीच्या पल्याड आईचा डोंगर’ हा गोंधळ सादर करून केला. हिंदू मुलींच्या शाळेच्या चमूने ‘गोंधळ, गोंधळ घालितो’ याचे अप्रतिम सादरीकरण केले. वरुडच्या विठाई ग्रुपने ‘बयो तुला बुरगुंडा होईल’ या भारुडाच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व, तसेच प्रदूषणाबाबत जागृतीपर संदेश दिला. राजेंद्र हायस्कूलच्या चमूने ‘नदीच्या पल्याड आईचा डोंगर’ हा गोंधळ तर आराध्या ग्रुपने ‘यमुनेच्या तिरी आज पाहिला हरि’ ही गवळण सादर करुन बहार आणली. या पथकात असलेल्या लहान मुलींनी अप्रतिम सादरीकरण केले. दिघोरीच्या देबू मेश्राम पथकाने व्यसनमुक्ती जागृतीसाठी अतिशय अभिनव पद्धतीने गोंंधळ सादर केला. राजेंद्र हायस्कूल क्र. 2 च्या पथकाने ‘अरे कृष्णा अरे कान्हा’ हे भारुड तर पौर्णिमा ग्रुपने तीन पिढ्यांच्या सहभागातून भुलाबाईची गाणी सादर केली. वृषाली देशपांडे व धनश्री पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरेख गुंफण केली. आभारप्रदर्शन वृषाली देशपांडे यांनी केले.