FEMA Case : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव ईडी कार्यालयात दाखल

    30-Oct-2023
Total Views |

Vaibhav Gehlot
(Image Source : Internet)

नवी दिल्ली :
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते वैभव गेहलोत आज अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) उल्लंघन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने वैभव यांना गुरुवारी समन्स बजावून आज चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. त्यामुसार आज वैभव हे ११.३० वाजताच्या दरम्यान ईडी कार्यालयात दाखल झाले.
 
राजस्थानमधील पेपर लीक प्रकरणी नुकतेच ईडीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्या घरावर छापा टाकला होता. यासोबतच ईडीने फेमा प्रकरणी वैभव गेहलोत यांना समन्स बजावले होते. यापूर्वी ईडीने २५ ऑक्टोबर रोजी वैभव यांना समन्स धाडून गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र वैभव यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. त्यानंतर चौकशी लांबणीवर टाकत त्यांना ३० ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आले.

काय आहे प्रकरण
वैभव यांच्या कंपनीवर शेल कंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप आहे. भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी ९ जून रोजी याबाबत ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती. वैभव यांनी मॉरिशसच्या एका कंपनीच्या माध्यमातून हॉटेलमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप मीना यांनी केला होता. तसेच त्यांनी वैभव गेहलोत आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर ईडीने वैभव गेहलोत यांना चौकशीची नोटीस पाठवली.