- 155 कलाकारांनी सादर केले अप्रतिम शास्त्रीय नृत्य
नागपूर : कथक, भरतनाट्यम कुचिपुडी, उडीसी आणि मोहिनीअट्टम या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारातील महाराष्ट्रभरातून आलेल्या कलाकारांच्या अखंड घुंगरू नादाने धरमपेठ म. पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला. बारा तास चाललेल्या या अखंड घुंगरू नाद उपक्रमात 155 कलाकारांनी आपली कला सादर केली.
उत्तर अंबाझरी मार्गावरील महाविद्यालयाच्या विनायकराव फाटक स्मृती सभागृहात रविवारी धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट ॲण्ड कल्चर सेंटरतर्फे 'अखंड घुंगरू नाद-2023' या शास्त्रीय नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, पुणे आदी महाराष्ट्रातील तसेच, मध्यप्रदेशातील 36 संस्थांच्या 155 कलाकारांनी अप्रतिम नृत्य प्रस्तुती दिली.
सकाळी 7.30 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंघचालक रामभाऊ हरकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले. यावेळी धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. उल्हास औरंगाबादकर, उपाध्यक्ष रत्नाकर केकतपुरे, सचिव मंगेश फाटक व पदाधिकारी आनंद आपटे, सुरेश देव, नटराज आर्ट ॲण्ड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास, शशीमोहन जोशी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
नटराज आर्ट सेंटरच्या शिक्षिका पूजा हिरवडे व अवंती काटे यांनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्राला किंकणी श्लोकावर आधारित तयार केलेल्या ‘थीम सॉंग’ ने अखंड घुंगरू नादला प्रारंभ झाला. सकाळी 8 ते रात्री 8 या बारा तासात चार टप्प्यात झालेल्या या उपक्रमात दर तासाला या ‘थीम सॉंग’ वर या दोन्ही कलाकारांनी प्रस्तुती दिली. ज्येष्ठ गुरू मदन पांडे, रत्नम जनार्दनम, स्वाती भालेराव, अमरावतीहून आलेले ओडीसीचे ज्येष्ठ गुरू मोहन बोडे यांच्यासह 12 गुरूंनी या नृत्याच्या महायज्ञाला आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली.
अखंड घुंगरू नादचे हे यंदाचे दुसरे वर्ष आहे. सर्व कलावंतांनी एका मंचावर येऊन आपली कला प्रस्तुत करीत नटराजाची सेवा करावी, भारतीय प्राचीन कलांचा प्रचार व प्रसार सर्वांनी मिळून करावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे, असे डॉ. रवींद्र हरिदास यांनी सांगितले. जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी पुढील वर्षी 20 तासांचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. संस्कार भारतीचे आशुतोष अडोणी, मनोज श्रोत्री आदी प्रदाधिकारी, सेवासदनचे उपाध्यक्ष बापू भागवत, सचिव वासंती भागवत उपक्रमाला हजेरी लावली. सर्व कलाकारांनी सादर केलेल्या सामूहिक घुगंरू नादाने कार्यक्रमाचा समारोप झाला.