Japan : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ओसाका येथे जी 7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी

    28-Oct-2023
Total Views |
 
piyush-goyal-discusses-international-trade-in-osaka - Abhijeet Bharat
 
ओसाका : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आज जपानमधील ओसाका येथे जी 7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. गोयल यांनी पुरवठा साखळी लवचिकता वाढविण्याचा मुद्दा मांडला आणि या संबंधी अनेक सूचना केल्या. कोविड 19 साथरोग आणि भू-राजकीय घटनांमुळे विद्यमान पुरवठा साखळीतील असुरक्षा समोर आली आहे, परिणामी वस्तूंच्या किमती आणि जागतिक महागाई वाढली आहे असे त्यांनी नमूद केले.
 
 
सार्वजनिक-खाजगी भागीदारी, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि पुरवठा साखळीत नवोन्मेष आणि डिजिटलीकरणाची गरज या बाबींना त्यांनी प्रोत्साहन दिले. पुरवठा साखळीत वैविध्य आणि कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्याची गरज, गोयल यांनी अधोरेखित केली. त्यांनी सरकारांना पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी आणि सीमेपलिकडे व्यापार सुलभ करण्यासाठी नियामक आराखड्यावर सहकार्य करण्याचे आवाहन केले. जी 20 च्या नवी दिल्ली घोषणापत्रात नमूद केलेल्या जीव्हीसीच्या मॅपिंगसाठी जेनेरिक आराखडा तयार करण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला.
 
 
या सत्रात सरकार, खाजगी क्षेत्र आणि ओईसीडी, जागतिक व्यापार संघटना अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. लवचिक पुरवठा साखळी विकसित करण्याबाबत बहुतांश खाजगी क्षेत्रांनी आपले सकारात्मक अनुभव सामायिक केले. सुझुकीने भारतातील त्यांच्या अनुभवाबाबत सादरीकरण केले. आपण भारतात एक विश्वासार्ह विक्रेता म्हणून कसा जम बसवला आणि भारतातील पुरवठा साखळींमध्ये 95 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशीकरण कसे साध्य केले याचा उल्लेख, सुझुकीने केला. ERIA ने, त्यांनी केलेल्या अभ्यासाचाही उल्लेख केला ज्यामध्ये जागतिक मूल्य साखळीत भारताची वाढलेली टक्केवारी दिसून आली. ऑस्ट्रेलिया, चिली, इंडोनेशिया आणि केनियाच्या मंत्र्यांनीही या विषयावर आपली मते मांडली आणि सूचना सामायिक केल्या.
 
गोयल यांनी अनेक मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा केली. गोयल यांनी जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री निशिमुरा यासुतोशी, ब्रिटनच्या उद्योग आणि व्यापार राज्य सचिव केमी बडेनोक, ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल, अमेरिका व्यापार प्रतिनिधी आणि राजदूत कॅथरीन ताई, जर्मनीच्या आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती मंत्रालयाच्या सचिव उदो फिलिप यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करणे, शुल्क संबंधी अन्य अडथळे दूर करणे, विद्यमान परकीय व्यापार कराराच्या वाटाघाटींची सद्यस्थिती आणि जागतिक व्यापार संघटनेसंबंधी आगामी मंत्रिस्तरीय परिषद यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. गोयल यांनी डब्ल्यूटीओच्या महासंचालक एनगोझी आणि मित्सुई, जपान आणि जपान-भारत व्यापार सहकार्य समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागावा यांचीही भेट घेतली.