न्यू कॉलेजमध्ये संख्याशास्त्र सुधारित अभ्यासक्रम कार्यशाळा

    28-Oct-2023
Total Views |
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० विद्यार्थीकेंद्रित आणि सर्वसमावेशक : डॉ. महाडीक
mathematics-workshop-educational-program-sybsc-part-2-kolhapur - Abhijeet Bharat
 
कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स मराठा बोर्डिंग हाऊसचे न्यू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने बी.एस्सी. भाग २ च्या सुधारित अभ्यासक्रमावरील एक दिवशीय कार्यशाळा नुकतेच महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. बी. महाडीक सन्माननीय अतिथि तर दि न्यू कॉलेज कोल्हापूर चे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच पी. व्ही. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पाटील आणि विभागप्रमुख डॉ. ए. ए. कलगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
प्रास्ताविकामध्ये डॉ. कलगोंडा यांनी सुधारित अभ्यासक्रमावर व्यापक चर्चा होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी अभ्यासक्रमातील नवीन घटकांवर सांगोपांग चर्चा व्हावी आणि एकत्र येण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे सांगितले. बीजभाषणात डॉ. महाडीक यांनी स्वायत्त महाविद्यालयांनी २०२३-२४ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणले असून हे धोरण (एनइपी-२०) विद्यार्थीकेंद्रित आणि सर्वसमावेशक असल्याचे प्रतिपादन केले. त्यानुसार सुधारित अभ्यासक्रमावर व्यापक चर्चा या कार्यशाळेत घडावी असेही सांगितले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. ए. ए. कलगोंडा, प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, डॉ. के. जी. पोतदार आणि डॉ. ए. व्ही. दोरुगडे यांनी सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
याप्रसंगी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे आणि साधन व्यक्तींचे स्वागत भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शेवटी कार्यशाळेचे निमंत्रक सहायक प्राध्यापक दादासाहेब गोडसे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ते आजरा महाविद्यालय आजरा येथील संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. के. जी. पोतदार यांनी 'प्रॉबॅबिलिटि डिस्ट्रिब्युशन्स-१’ या पेपर विषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्राच्या प्रमुख साधन व्यक्ती देवचंद कॉलेज, अर्जुननगर चे डॉ. पी.वाय. पाटील यांनी ‘स्टॅटिस्टिकल मेथड्स-१’ या पेपरमधील सुधारित अभ्यासक्रमातील सुधारित घटकांची चर्चा केली. त्यानंतर कार्यशाळेतील उपस्थितांचे समूह छायाचित्र घेण्यात आले. भोजन अवकाशानंतरच्या सत्राचे साधन व्यक्ती यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे सहायक प्राध्यापक डॉ. ए.व्ही. दोरुगडे यांनी प्रात्यक्षिक पेपरमधील सुधारित प्रात्यक्षिकांचे स्पष्टीकरण केले. या तीन सत्रासाठी अनुक्रमे बिद्री येथील दूधसागर महाविद्यालयाचे डॉ. सुभाष पाटील, विलिंग्ड्न महाविद्यालयाच्या डॉ. एस. एस. कुलकर्णी आणि पी. व्ही. पी. महाविद्यालयाचे प्रा. विजय कोष्टी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यानंतर डॉ. एस. बी. महाडीक, डॉ. ए. ए. कलगोंडा, डॉ. के. जी. पोतदार, डॉ. पी.वाय. पाटील व डॉ. ए.व्ही. दोरुगडे यांचे सहभागी शिक्षकासमवेत सुधारित अभ्यासक्रम, एनइपी-२० यावर विस्तृत चर्चा झाली. यावेळी प्रा. डी. एन. कलंगे, प्रा. लालासो गायकवाड यांनी अभ्यासक्रमामध्ये काही बदल आणि संगणक प्रयोगशाळा असणेची गरज स्पष्ट केली.
 
त्यानंतर कार्यशाळेच्या शेवटच्या निरोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. डॉ. महाडीक यांनी कार्यशाळेचा थोडक्यात आढावा घेताना स्पर्धेत टिकण्यासाठी संख्याशास्त्राच्या सर्वच शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांनी ‘शालेय शिक्षणात संख्याशास्त्र हा विषय स्वतंत्रपणे शिकवला जात नसल्यामुळे बऱ्याच पालकांना व विद्यार्थ्यांना सुरुवातीला हा विषय माहीतच नसतो. संख्याशास्त्र स्वतंत्र विषय म्हणून बी. एस्सी. च्या प्रथम वर्षापासून शिकवला जातो, तोपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि संगणक शिक्षण निवडलेले असते. यासाठी संख्याशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याची निकड विशद केली.
 
निरोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे प्राचार्य कुंभार यांनी एनइपी-२० मध्ये बऱ्याच बदलांना सामोरे जावे लागणार असून पुरेशी विद्यार्थी संख्या आणि कार्यभार हे मुद्दे महत्वाचे ठरतील, असे सांगितले. याप्रसंगी डॉ. कुरणे, प्रा. कलंगे, प्रा. शिंदे या शिक्षकांनी कार्यशाळेविषयी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा नायकवडी यांनी केले. या कार्यशाळेसाठी हलकर्णी,चंदगड, आजरा, बिद्री, कोल्हापूर रेठरे बुद्रुक, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव, सांगली, मिरज, आदी महाविद्यालयातील प्राध्यापक, या महाविद्यालयातील संख्याशास्त्राचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन सहायक प्राध्यापक डॉ. डी.जी.दादासो गोडसे, एस. एम. पानवलकर, के.के. गायकवाड, सोनम श्रीकांत पाटील, सोनम संभाजीराव पाटील आणि विशाल नायकुडे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, विभागप्रमुख डॉ. ए. ए. कलगोंडा यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.