(Image Source : Internet)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Pakistan Former Prime Minister Nawaz Sharif) यांची घरवापासी झाली आहे. गेली अनेक वर्ष ते पाकिस्तानमधून परागंदा होऊन लंडनमध्ये जाऊन बसलेले नवाझ शरीफ पुन्हा पाकिस्तानमध्ये परतले आहेत. पाकिस्तानची ही परंपराच आहे, ज्यावेळी पंतप्रधान पद जाते त्यावेळी तेथील पंतप्रधानांना एकतर देश सोडून पळून जावे लागते किंवा जेलमध्ये जावे लागते. काही पंतप्रधान तर थेट ढगात गेल्याचाही पाकिस्तानचा इतिहास आहे.
नवाझ शरीफ यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला, तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. नवाझ शरीफ यांचा पराभव केल्यावर इम्रान खान पंतप्रधान बनले आणि त्यांनी नवाझ शरीफ यांचा भ्रष्टाचार उकरून काढून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला. इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर नवाझ शरीफ यांची तुरुंग वारी निश्चित झाली होती. मात्र जेलमध्ये जाण्याआधीच नवाझ शरीफ लंडनला पोहोचले. आता पुलावरून पाणी वाहून गेले आहे. पाकिस्तानमधील परिस्थिती आता बदलली आहे. इम्रान खान यांचे पंतप्रधान पद गेले आहे. जे इम्रान खान नवाझ शरीफ यांना जेलमध्ये टाकणार होते, तेच इम्रान खान आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले आहेत. परंपरेप्रमाणे इम्रान खान यांचे पंतप्रधान पद गेले आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली.
नवाझ शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ हे पंतप्रधान बनले. इम्रान खान यांना पदावरून हटवण्यात लष्कराचा मोठा वाटा होता. इम्रान यांनी लष्कराच्या कलेने राज्य कारभार केला नाही, त्याची शिक्षा त्यांना लष्कराने दिली. पाकिस्तानात कोणीही पंतप्रधान होवो त्याला लष्कराच्या कलेनेच कारभार करावा लागतो. तो जर त्यांनी केला नाही तर लष्कर त्यांना पदच्युत करून आपल्या पसंतीच्या व्यक्तीला खुर्चीवर बसवतो. शहाबाज शरीफ यांना देखील लष्करानेच खुर्ची दिली. मात्र त्यांना ती सांभाळता आली नाही. पाकिस्तानात त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. महागाई गगनाला भिडली आहे. लोकांना जगणे मुश्कील झाली आहे. बलुचिस्तान सारख्या भागातून उठाव होत आहे. जनता रस्त्यावर उतरत आहेत. तालिबानचा त्रास वाढला आहे. एकूणच पाकिस्तानात अराजकता माजली आहे. पाकिस्तानला या अराजकतेतून बाहेर काढण्यासाठी नवाझ शरीफ सारख्या अनुभवी व्यक्तीची गरज आल्याने तसेच शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता येणे अवघड आहे ,हे पाकिस्तान पीपल पार्टीच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच नवाझ शरीफ यांची घरवापसी झाली आहे.
नवाझ शरीफ यांची घरवापसिकडे भारताचेही बारीक लक्ष आहे. कारण कदाचित तेच पाकिस्तानचे आगामी पंतप्रधान असतील. अर्थात याआधी ते तीनदा पाकिस्तानचे पंतप्रधान होते. यावेळी त्यांनी भारताशी मैत्री करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे मान्यच करावे लागेल. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना दिल्ली लाहोर बससेवा सुरू करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. २०१४ साली मोदी पंतप्रधान बनले, तेव्हा त्यांच्या शपथविधीला त्यांनी सर्वांचा विरोध झुगारून हजेरी लावली होती. मोदींनीही लाहोरला जाऊन त्यांची भेट घेतली होती. ते भारताशी मैत्री करू इच्छितात हे त्यावेळच्या लष्करप्रमुखांना पसंत नव्हते. म्हणूनच त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्ध घडवून आणले. लष्कराच्या विरुद्ध जाऊन नवाझ शरीफ यांनी कारगिल युद्ध थांबवण्यास सहमती दिल्याने जनरल मुशर्रफ यांनी त्यांना पदच्युत करून स्वतः पाकिस्तानचे प्रमुख बनले. तेव्हाही नवाझ शरीफ यांना लंडनमध्ये लपून बसावे लागले. जर तेव्हा नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान सोडले नसते, तर नवाझ शरीफ यांना देहांताची शिक्षा देण्याची तयारी मुशर्रफ यांनी केली होती, अशी चर्चा तेव्हा पाकिस्तानात होती.
अनेक वर्षांनी आता ते पुन्हा पाकिस्तानात परत आले आहेत. त्यांच्या घरवापसीचे भारतानेही स्वागतच केले आहे. मोदी आणि नवाझ शरीफ यांची मैत्री जगजाहीर आहे ते जर पुन्हा पंतप्रधान बनले तर भारत पाकिस्तानचे कटू संबंध सुधरायला मदतच होईल मात्र भारताशी मैत्रीचे संबंध स्थापित करताना त्यांना लष्कराशिही जमवून घ्यावे लागेल अन्यथा पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.