- नुकसानग्रस्ताने स्वतःचा धनादेश दिला सफाई कामगाराला
वाडी : वाडी परिसरात शनिवार २३ सप्टेंबर रोजी पहाटे चार ते साडे पाच वाजता पर्यंत विजांच्या भयावह गडगडाटी सह रेकाँर्ड ब्रेक मुसळधार पाऊस पडून वाडी शहराच्या मध्यभागातून वाहत असलेल्या नाग नदीला पूर आला होता.नागनदीला संरक्षण भिंत नसल्यामुळे ते पाणी काठावरील वास्तव्याला असलेल्या नागरिकांच्या घरात तीन ते चार फुट पाणी जमा झाले होते. त्यामुळे घरातील अन्नधान्य तथा जीवनापयोगी वस्तूचे खुप मोठया प्रमणात नुकसान झाले होते. आमदार समीर मेघे यांनी तातडीने याची दखल घेत वाडी न.प.चे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख व काही नागरिकांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित सर्व्हे करून घेतला व शासनातर्फे पीडितांना ताबडतोब आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
अतिवृष्टीदरम्यान पहाटे पाच वाजतापासूनच मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी नगर परिषद तर्फे आपत्कालीन मदतकार्य यंत्रणा सुरु केली होती. आमदार समीर मेघे यांनी आवश्यक त्या सर्व यंत्रणा कामी लावून व आश्वासनांची पूर्तता करून बुधवार २५ ऑक्टोबर रोजी वाडी नगर परिषद कार्यालयात वाडी परिसरातील सर्व नुकसानग्रस्त महिला व नागरिकांना निमंत्रित करून झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयाचा धनादेश आमदार समीर मेघे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. व्यासपीठावर नागपूर ग्रामीणचे नायब तहसीलदार सचिन शिंदे, मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख, तलाठी किशोर शिवरकर,पुरुषोत्तम रागीट, अभिजित जोशी, माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे , माजी सभापती केशव बांदरे, माजी सभापती कैलाश मंथापूरवार ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, भाजपा वाडी मंडळ अध्यक्ष आनंदबाबू कदम, माजी सभापती सरीता यादव, माजी सभापती कल्पना सगदेव, माजी नगरसेवक राकेश मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मिळालेली ही आर्थिक मदत झालेल्या नुकसानीपेक्षा कमी असली तरी आश्वासनाप्रमाणे आमदारांनी तातडीने कारवाई करून आर्थिक मदत केल्याचे समाधान नुकसान ग्रस्तांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान सफाई कामगाराच्या तत्परतेची दखल घेऊन एका पीडिताने नुकसान भरपाई म्हणून मिळालेला चेक त्याचवेळी सफाई कामगारांच्या हातात दिला. संचालन ज्येष्ठ लिपिक योगेश जहागीरदार यांनी तर आभार केशव बांदरे यांनी मानले. यावेळी सुधीरसिंग राणा, देवेंद्र बोरीकर, चंदू कावरे, योगेश शेंडे, ईशांत राऊत, अक्षय तिडके, राहूल तायडे,चंद्रशेखर देशभ्रतार, धनंजय कलसे ,नुकसानग्रस्त व इतर नागरीक उपस्थित होते.