चांदूर रेल्वे : संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेले तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी उर्फ अवधूत महाराज देवस्थानात दस:याच्या शुभ मुहूर्तावर ७२ फुट उंच देव व भक्तांच्या झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा विधीवत, नेत्रदीपक सोहळा अवधूती भजनांच्या अखंड गजरात दुपारी ४ वाजता उत्साहात पार पडला.
दस:याला सकाळ पासूनच श्री अवधूत महाराजांच्या समाधीच्या (बोहली) दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती. अनेकजण विटेवर कापूर जाळून श्रध्दा व्यक्त करीत होते. दस:याला दुपारी १२ वाजता मंदिराच्या विश्वस्तांनी केशर, अष्टगंध, दही, दुध, शहद, तुप, तीळ, अत्तर, कस्तुरी यांचे मिश्रण आणि चंदन खोड घासून चंदनउटीचा गलप तयार केला. चंदन उटीचे गडवे, कापुर ज्योत, महापूजा ताट, हाराची फुलारी, स्वच्छ पाण्याचा घडा, धुपारणे, अगरबत्ती व गलप साहित्य घेऊन चंदनउटीला सुरूवात केली. प्रथम कृष्णाजी महाराज यांची समाधी, ईश्वर पुनाजी व भक्तांची समाधी, देव व भक्ताचे समानतेचे झेंडे, लहान मंदिर व मोठे मंदिरातील समाधी यांचे अभिषेक करून चंदन उटीने पूजा केली. पानाचा विडा व साखर, सुपारी, पुष्प, अक्षता अर्पण करून सामुहिक महाआरती झाली.यावेळी अखंड कापूर ज्योत व सामूहिक अवधूती भजनाची मांड सुरू होती. या सोहळयाला देवस्थान समितीचे अध्यक्ष वामन रामटेके, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव गोविंद राठोड यांच्यासह हरिदास सोनवाल, विनायक पाटील, दिगांबर राठोड, पुंजाराम नेमाडे, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, विश्वास रामटेके, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.
पदस्पर्श न करता चढविली जाते खोळ
दूपारी ४ वाजता श्री अवधूत महाराज मंदिरातील ७२ फुट उंच देव व भक्तांच्या झेंड्यांना ५० मीटर कापडापासून बनवलेली नवीन खोळ चढविण्याच्या विधीला सुरूवात झाली.मंदिराचे विश्वस्त चरणदास कांडलकरांनी झेंड्यांना पदस्पर्श न करता व दोरखंडाच्या साह्याने जुनी खोळ काढली आणि नवीन खोळ झेंडयांवर टाकुन हळुहळू खाली सरकवत व बांधलेले दोरखंड सोडत नवीन खोळ टाकली. हा चित्तथरारक सोहळा तब्बल दोन तास चालला.