अमरावती : आई-वडिल कामानिमीत्त घराबाहेर गेले आणि चिमुकली अडीच वर्षीय मुलीला शेजारच्या घरी ठेवले. परंतू शेजारची महिलाही काही क्षणाकरिता घराबाहेर गेली आणि तेवढ्यातच अडीच वर्षीय मुलीने आतून दाराची कडी लावून घेतली. त्यानंतर शेजारच्यांसह मुलीच्या आई-वडिलांची चांगलीच ताराबंळ उडाली होती. याबाबतच्या माहितीवरून अग्निशमन दल काही वेळातच मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घराचे दार तोडून चिमुकलीची सुटका केली. त्यावेळी शेजारच्यांसह आई-वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना बुधवार, 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10:50 वाजता पार्वती नगर क्र. 2 मधील वक्रतुंड रेसिडेन्सी येथे घडली.
अडीच वर्षीय स्वामिनी कपिल इंगोले या मुलगी वक्रतुंड रेसिडेन्सीमधील शेजारी रेखा उमेश भुयार यांच्या घरी होती. दरम्यान रेखा भुयार काही वेळाकरिता घराबाहेर गेल्या आणि त्याचवेळी स्वामिनीने दाराची कडी आतून लावून घेतली. त्यामुळे तेथील सर्व रहिवाशी घाबरून गेले होते. त्यानंतर घराच्या आतमध्ये लहान बाळ अडकलेले आहे, अशी माहिती तेथील रहिवाश्यांनी भ्रमणध्वनीद्वारे अग्निशमन विभागाला दिली. या माहितीवरून अग्निशमनचे फायरमन किशोर शेंडे, सूरज लोणारे, ऋषिकेश जाधव, महेंद्र गायधने व वाहन चालक अभिषेक निंभोरकर यांचा चमु तातडीने घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाची बचाव पथकाने घटनास्थळाची पाहणी करून, जवळील साहित्याच्या मदतीने घराच्या आतमध्ये अडकलेल्या स्वामिनीला अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले.