- फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील भिंतीवरून पुन्हा चेंडू फेकून त्याद्वारे गांजा व गुटख्याचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी दुपारी पुढे आला आहे. यापूर्वीसुद्धा गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी एका चेंडूसोबत गांजा व गुटखा सापडला होता. आताच्या या प्रकरणी कारागृह कर्मचार्याच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी सुनील महादेव फुफरे (29) हे मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर बजावत होते. दरम्यान दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कारागृहातील बॅरेक क्रमांक 14 च्या टीनपत्रावर काही तरी वस्तू आदळल्याचा त्यांना आवाज आला. त्यावेळी त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता, तट क्रमांक 3 जवळ एक लाल रंगाचा चेंडू आढळून आला. त्यामुळे त्यांनी तट क्रमांक 2२ च्या गार्डला चेंडूवर लक्ष ठेवायला सांगून तातडीने या प्रकाराची माहिती कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार सुनील फुफरे यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी पंचासह घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी त्या चेंडूचे निरीक्षण करण्यात आल्यावर त्यात 30 ग्रॅम गांजा व गुटख्याच्या पुड्या आढळून आल्यात. पोलिसांनी गांजा व गुटखा जप्त करून रविवार, 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आठवडाभरातील दुसरी घटना
विशेष म्हणजे, 19 ऑक्टोबर रोजीही कारागृहात एक चेंडू आढळून आला होता. त्यातसुद्धा 19 ग्रॅम गांजा व नागपुरी खर्रा होता. सोबतच 18 ऑक्टोबर रोजी दोन कैद्यांजवळ मोबाइलसुद्धा मिळून आला होता. आठवडाभरात घडलेल्या या तीन घटनांमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.