चांदुर रेल्वे : 'भाऊ सकाळ पासून रांगेत आहो, इथे न कोणी डॉक्टर आहे, न कोणी काही सांगत आहे, लहान मूल आहे, बाया आहे पण कोणाकडेच कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही.' असा फोन माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांना बुधवारी सकाळी आला. त्यावरून विरेंद्र जगताप यांनी थेट ग्रामीण रुग्णालयात गाठले. तेथे जाऊन त्यांनी फोन वरून आरोग्य अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले, लवकर सुधारणा करा नाही तर रुग्णालयाला कुलूप ठोकण्याच इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. हा सर्व प्रकार कंत्राटी कर्मचा:या काम बंद आंदोलनामुळे असल्याचे सांगितले जात होते.
बुधवार (25 ऑक्टोबर) पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचा:यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असल्याने सकाळी ओपीडी मध्ये रुग्णांच्या नोंदणीसाठी कुणीच हजर नव्हते, ही परिस्थिती औषधी, ड्रेसींग, रक्त तपासणी, तपासणी अहवाल इत्यादी विभागात होते. ही सर्वच कामे खोळंबली होती. या प्रकार पाहून माजी आमदार जगताप चांगलेच संतापले.
हजेरी रजिस्टर पाहून वास्तव कळले
त्यांनी कर्मचारी यांचे रजिस्टर तपासले असता त्यांना वास्तव कळले. 22 कर्मचारी कंत्राटी तर 25 कर्मचारी नियमित असे 47 कर्मचारी रुग्णालयात कार्यरत आहे. त्यातील केवळ 12 कर्मचारी आंदोलनात सहभागी होते. असे असतांना इतर वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, यांच्यासह इतर सहाय्यक कर्मचारी कुठे गेलेत असा जाब जगताप यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारला. त्यावरून कुणी दीर्घ रजेवर, कुणाची सेवा अधिग्रहित केलेली, तर कुणी ड्युटी करून घरी गेल्याचे समजले. यामुळे रुग्णालयातील सर्वच यंत्रणा कोलमडल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरेंद्र जगताप यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन वरून माहीती देत चांदुर रेल्वे ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देण्यासाठी सांगितले. यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फाफट यांना परिस्थिती सुधारा अन्यथा आम्ही ग्रामीण रुग्णालयाला कुलूप लावू असा इशारा दिला. यावेळी त्यांच्यासोबत शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणा कंत्राटी च्या भरवशावर
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून शासन सेवेत काम करीत आहे. सेवेत कायम करणे व मानधनात वाढ करणे या मागण्यासाठी त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा पहिल्याच दिवशी रुग्णांना फटका बसला आहे.