- सरस्वती नगर परिसरातील मणिपूर लेआऊटमध्ये थरार
- वनविभागाच्या वाहनावर हल्ला
अमरावती : 15 दिवसापासून राममोहन नगराला आपले जंगल बनविलेल्या बिबट्याचे बुधवार (25 ऑक्टोबर) रोजी लोकांना दिवसाच्या सुर्यप्रकाशात साक्षात दर्शन झाले. त्यानंतर वनविभाग, वण्यप्रेमी संस्था आणि पोलीस विभागाकडून त्याला जेरबंद करण्याची कसरत सुरु झाली. या प्रक्रीयेला 15 तासांचा कालावधी उलटल्यावरही म्हणजेच रात्री 10 वाजेपर्यंत या बिबट्याची लपाछपी सुरुच होती. दरम्यान या 15 तासाच्या कालावधीत अनेक अश्या घटना घडल्या की, शेकडो लोकांनी ‘याची देही याची डोळा’ हा थरार अनुभवला. या बिबट्याने वनविभागाच्या वाहनावर हल्ला करत एका कर्मचा:याला पंजा मारण्याचा प्रयत्नसुध्दा केला.
सकाळी 8 वाजता काय घडले?
बुधवारी सकाळी 8 वाजता काही लोकांना मणिपूर(गुप्ता) लेआऊटच्या झुडूपात काही लोकांना बिबट दिसून आला. त्यानंतर वनविभाग व पोलिस विभागाला या प्रकाराची माहिती देण्यात आली.
सकाळी 8 वाजता काही नागरिकांनी फोन केल्यानंतर तब्बल दोन तासांनी 10 वाजता वनविभागाची रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल झाली. मणिपूर’ ले-आऊट मध्ये बिबट्या असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच लगतच्या लक्ष्मी नगर, शोभा नगर, महेंद्र कॉलनी, प्रवीणनगर, बजरंग टेकडी आदी भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर या गर्दीला पांगविण्याकरिता सकाळी 11 वाजता पोलिस बंदोबस्त पोहोचला. एकीकडे वन विभागाचा चमू बिबट्याचा शोध घेत असताना दुसरीकडे नागरिकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली..
ड्रोन ने केली पाहणी, जेसीबीने केले मैदान मोकळे
दरम्यान दाट झाडाझुडपात बिबट्या दडून बसल्याने वन कर्मचारी, वन्यजीवप्रेमींनी परिसर पिंजून काढला. बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यासाठी परिसराला जाळीचे संरक्षण लावण्यात आले. बिबट्या नेमका कोठे दडून बसला याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा, बुलडोजरची मदत घेण्यात आली. दरम्यान बिबट या झाडीमधून दुस:या झाडीमध्ये आश्रय घेतांना अनेकांना त्याचे दर्शन झाले. हा थरार अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. मात्र, सायंकाळी ६ वाजल्यानंतरही नागरिकांची मोठी गर्दी असल्याने बिबट्याला बंदुकीद्वारे बेशु्द्ध (ट्रँक्विलाइज) करता आले नाही. घटनास्थळी सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, आरएफओ वर्षा हरणे, रेस्क्यू पथकाचे आरएफओ प्रभाकर वानखडे, पशु वैद्यकीय अधिकारी सागर ठोसर आदी उपस्थित होते.
वण्यजीव संस्थांचा मोलाचा सहभाग
यावेळी अनेक वण्यजीव संस्थांचे प्रतिनिधी, वण्यजीवप्रेमी, स्वयंसेवकांचा सहभाग अत्यंत मोलाचा ठरत होता. कारण चारही बाजूंनी नागरिकांच्या आवाजाने बिथरलेल्या बिबटला जेरबंद करता वनविभागाची चांगलीच दमछाक झाली होती. मात्र वण्यजीव प्रेमी सूतभरही मागे हटले नाही, ते अखेरपर्यंत सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी होते. रेस्क्यू पथकाचे सर्च ऑपरेशन सुरु असतानाच त्यांच्या वाहनावर बिबटने झेप घेतली. त्यावेळी वनपाल फिरोज खान हे वाहनात होते. यावेळी वनविभागाचे तिन पथके सज्ज होती. यामध्ये एसीएफ, रेस्कू चमु व प्रादेशिकची टिमचा सहभाग होता. तर एनजीओमध्ये युथ फॉर नेचर कर्न्झेवेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल सोनोने, वॉर संस्थेचे निलेश कंचनपूरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी घेतले कोंडून
मणिपूर ले-आउटमध्ये बिबट हा श्वान अथवा वराहाची शिकार करण्याचा उद्देशाने व्हिएमव्ही परिसरातून बाहेर पडला असावा, असा अंदाज रेस्क्यू पथकाने व्यक्त केला. सुदैवाने बिबटमुळे कुणाला कोणतीही हानी झाली नाही. केवळ नागरिकांची धावपळ करताना काही नागरिक जमिनीवर कोसळून जखमी झाले. बिबटला जेरबंद करण्यासाठी एसीएफ ज्योती पवार, रेस्कु टिम आरएफओ प्रभाकर वानखडे, वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, प्रादेशिक व रेस्क्यूचे सर्व पथक यांचे सर्च ऑपरेशन सुरु होते. रात्रीच्या वेळी बिबट्याने आपल्या घरात शिरु नये याकरिता परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त सुरक्षा बाळगत स्वत: ला घरात बंद करुन घेतले.
नागरिकांनी दक्षता बाळगावी
बिबटचा मुक्तसंचार पाहता वन विभागाने बिबटयाला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक सज्ज ठेवावे, अशा सुचना आ. सुलभा खोडके यांनी दिल्या आहेत. मणीपूर ले-आउट व पाठ्यपुस्तक परिसरातील नागरिकांनी सतर्कता व दक्षता बाळगावी, असे आवाहन आ. खोडके यांनी केले.
ओ माय पया पया...
दरम्यान एक व्हिडीओ प्रचंड वायरल झाला. एक महिला आपल्या घराच्या छतावर उभी राहून व:हाडी भाषेत इकडे बघा दादा, तिकडे बघा दादा, असा वनविभागाच्या चमूला निर्देशवजा सल्ला देत होती, तेवढ्यात बिबट्याने वनविभागाच्या वाहनावर झेप घेतली. हे पाहता क्षणी या महिलेला पडता भुई थोडी झाली होती. पडतांना ती अव माय पया पया…. अशी ओरडत होती. हे ऐकुन अनेकांना आपले हसू आवरले नाही.
वन विभागासह रेस्क्यू पथकाची चमू घटनास्थळी तळ ठोकून आहे. मणिपूर ले-आऊट परिसरात बुधवारी सकाळी बिबट्या लोकांना आढळून आला. त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.