सिस्टिम सोबत कॉमन रूल सेट केल्यास कोणीही तुमच्यासोबत काम करेल

    23-Oct-2023
Total Views |
  • स्वस्तिक जैन, मरियम हुसैन यांनी दिला कानमंत्र
workplace-employee-empowerment - Abhijeet Bharat
 
नागपूर : उद्योगाचा, व्यापाराचा नफा दरमहा वाढावा, ही व्यावसायिकाची अपेक्षा असते. त्यात गैर नाही. पण हे करताना सोबत काम करणारे कर्मचारी नोकरी सोडून जातात. त्यामुळे मनुष्यबळा अभावी यंत्रणा प्रभावित होण्याची जोखीम असते. सोबत काम करणारे सोडून जाऊ नयेत, असे वाटत असेल तर प्रत्येकाच्या कामाचे योग्य मुल्यमापन करताना सर्वांना समान न्याय देणारी सिस्टिम तयार करा. तुमच्यासकट सर्वांसाठी एकच रुल असेल तर कोणताही कर्मचारी जॉब सोडण्याचा विचार देखील करणार नाही. कामाच्या समाधानासोबतच योग्य आर्थिक मोबदला मिळत असेल तर कोणीही तुमच्यासोबत काम करायला तयार होईल, असा सल्ला रविवारी स्वस्तिक जैन आणि मरियम हुसैन यांनी येथे दिला.
 
निमित्त होते विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्यावतीने दर महिन्याला आयोजित साप्ताहिक चर्चाससत्रे. एनहान्स टिम प्रॉडक्टिव्हिटी आणि व्यवस्थापनावरील नियंत्रण हा विषय केंद्रस्थानी ठेवून हा संवाद आयोजिण्यात आला होता. कर्मचाऱ्यासाठी पगार महत्त्वाचा असला तरी, कामाचे समाधानही तितकेच महत्त्वाचे असते, असे नमूद करीत जैन म्हणाले, आपल्याच निर्णयात जर अस्ताव्यस्तपणा असेल तर कर्मचारी गोंधळून जातात. मात्र आपण कर्मचाऱ्यांना दोष देत बसतो. ज्यावेळी पगार वाढविण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही मालकाच्या भूमिकेत असता. पण अनेकदा कामाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी राहते. त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. नोकरी सोडतात, कर्मचारी इतर ठिकाणी जास्त पगार मिळत असल्याचे कारण देतो. यामागचे खरे कारण वेगळेच असू शकते. त्यामुळे प्रत्येक उद्योजक, व्यावसायिक, कारखानदाराने सर्वांत आधी स्वतःची धोरणे ठरविली पाहिजेत.
 
कामाची प्राथमिकता निश्चित केली पाहिजे. त्यासाठी स्वतःपासून सुरूवात करा. तुमच्यासह सर्वांना समान नियम लागू करा. त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. दर आठवड्याला कर्मचाऱ्यांचा परफॉर्मंस रिव्ह्यू घ्या. एखादा कमी पडत असेल तर न रागावता त्याच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. कामाच्या वेळेपासून ते सुट्या, वेतन, इन्सेंटिव्ह, फेस्टिव्हल बोनस या सगळ्यांसाठी क्लिअर पॉलिसी सेट करा. या नियमांना तुम्ही देखील अपवाद नाहीत, हे त्यांनाही समजवू सांगा. पगार वाढवून देताना योग्य मुल्यमापन करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे कर्मचारी छोट्या छोट्या गोष्टींसाठी कर्मचारी तुम्हाला महत्त्व देतील. त्यामुळे व्यवसायाचे नियंत्रण तुमच्या हाती राहिल. असा योग्य मोबदला आणि समाधान मिळत असेल कोणीही तुमच्या कंपनीतली नोकरी सोडायला तयार होणार नाही.
 
यावेळी अनुभव मांडताना मरियम हुसैन म्हणाल्या, ज्यावेळी आम्ही असे नियोजन केले नव्हते तेव्हा महिन्यातून एखादातरी जॉब सोडून जात होता. उद्योगात इन्क्वायरी यायच्या मात्र. ती हाताळणाऱ्या यंत्रणेत सातत्य नव्हते. कामाचे योग्य नियोजन करून जबाबदारीचे विभाजन केल्याने कर्मचाऱ्यांची नाराजी कमी झाली. त्यामुळे दरमहा जो तोटा व्हायचा, तो भरून निघाला. योग्य मुल्यमापनानंतर आर्थिक मोबदला मिळत असल्याने कर्मचारी देखील पहिल्यापेक्षा जास्त परफॉर्मंस देऊ लागले. यातून नफा वाढत गेल्याने आम्ही बोनस देखील देऊ शकलो. सहज सोडविता येणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने हे शक्य झाले.