नागपूर : पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणाने नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्या युवकाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडल्यामुळे संशय निर्माण झाला आहे. सूरजकुमार विलास बांबल (३२, रा. शिवगणेशनगर, पुणे) असे मृतकाचे नाव आहे. सूरज बांबल हा मूळचा अमरावतीचा असून पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीवर आहे. त्याचे गेल्या ६ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
गुरुवारी तो सकाळी नेहमीप्रमाणे नोकरीवर निघून गेला. तेव्हापासून तो घरीच परतला नाही. कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत वाट बघितल्यानंतर पुणे पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्याचा शोध सुरु असतानाच शनिवारला सकाळी ७ वाजता अंबाझरी तलावाच्या पाण्यामध्ये एका युवकाचे प्रेत तरंगत असल्याची सूचना अंबाझरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत पाण्याबाहेर काढले. मृतकाच्या खिश्यातील कागदपत्रावरून त्याचे नाव पुढे आले. याबाबत पुणे शहर पोलिसांशी नागपूर पोलिसांनी संपर्क साधला. सूरजने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत संशय निर्माण झाला आहे. तो पुण्यातून थेट नागपुरात कसा आला ? याचाही पोलीस तपास करीत आहेत.