कवठेमहांकाळ : नुकतेच सोलापूर येथील जिल्हा वृत्तपत्रलेखक मंचच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यामधील नऊ शिक्षक-शिक्षिकांचा शाल, गुलाबपुष्प, पुस्तक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव केला गेला. विविध वृत्तपत्रातून 'वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरांमधून सामाजिक आणि ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या वृत्तपत्र पत्रलेखकांना संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यामध्ये पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभाग प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक विजय कोष्टी यांना २०२१ मध्ये उत्कृष्ट वृत्तपत्र पत्रलेखक पुरस्कार जाहीर झाला होता.
तथापि, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर येथील ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती गायकवाड (स्वकुळ साळी), प्रमुख अतिथि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालायचे प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर आणि वसंतराव नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक ना. म्हमाणे, वृत्तपत्रलेखक मंचाचे अध्यक्ष सुनील पुजारी, उपाध्यक्ष वल्लभ करमरकर, कार्याध्यक्ष फैयाज शेख, कार्यवाह अरुण धुमाळ, कोषाध्यक्ष अशोक क. म्हमाणे, प्रांजली मोहीकर, मयूरेश कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत प्रा. कोष्टी यांना शाल, गुलाबपुष्प, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथील वसंतराव नाईक हायस्कूल च्या नूतन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रा. कोष्टी यांना यापूर्वी समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी (२०१७), नगर वाचनालय सातारा (२०१८,२०१९), पंढरपूर तालुका पत्रकार संघ (२०१९) यांचे उत्कृष्ट वृत्तपत्र पत्रलेखकाचे पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक आणि वृत्तपत्र क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल आम्ही कोल्हापुरी फौंडेशन (२०१८) आणि सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाचा साहित्यरत्न- २०१८ पुरस्कार, शिक्षक विकास परिषद गोवा यांचा राष्ट्रीय शिक्षक भूषण(२०१९), सोलापूर जिल्हा वृत्तपत्र संघाचा कै. तात्यासाहेब तेंडूलकर (२०२०), नाशिकच्या भावना सामाजिक संस्थेचा जीवनगौरव, ऋणमोचन संस्थेचा नाशिकरत्न भूषण (२०१९), पुण्याच्या स्वरकुल संस्थेचा ऑनलाईन टिचर एक्स्पर्ट (२०२० ), राज्य वृत्तपत्र आणि प्रेस क्लबचा कोरोना योद्धा (२०२०), आसाम साहित्य सभा आणि आपली मुंबई यांचा ‘हिंदुस्थान बुक ऑफ अवार्ड २०२१’ प्रबोधनकार ठाकरे सामाजिक न्याय पुरस्कार, भारतीय समाजोन्नती संघ, मुंबई चा ‘जयभारत- राष्ट्रचेतना पुरस्कार २०२१’, भिमा-नीरा विकास संस्था, इंदापूर चा ‘राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार २०२२’, महाराष्ट्र भूषण वामन दादा कर्डक संस्था, नाशिक चा ‘राजर्षि शाहू पुरस्कार २०२३’ असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
प्रा. कोष्टी हे मुळचे शिपूर (ता. मिरज) असून गेली ३२ वर्षे ते कवठेमहांकाळ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वृत्तपत्रातून विविध सामाजिक, ज्वलंत प्रश्नांवर लेखन केले असून ते अनेक मराठी-हिंदी दैनिकांचे नियमित वाचक असून वाचकांचा कॉलम, व्यासपीठ, प्रासंगिक आदी सदरामध्ये ते नियमितपणे विविध विषयांवर लेखन करतात. यावेळी शिक्षक प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव सुदर्शन शिंदे, प्राचार्य डॉ. एम.के. पाटील, माजी प्राचार्य डॉ. अशोक बाबर आणि सर्व सहकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभल्याचे प्रा. कोष्टी यांनी सांगितले.