नागपूर : दत्तात्रयनगरातील श्री संत ज्ञानेश्वर उद्यानात "सुगंधित बगीचा" उपक्रम राबविताना उद्यानातील हिरव्या झाडांची कत्तल न करता कामे पूर्ण करा. तसेच कामे टप्याटप्याने करण्यात यावी, अशी मागणी दत्तात्रयनगर उद्यान मित्र संघटनेने महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडारकर, सहसचिव बबन गांजरे, पांडुरंग वाकडे, सिद्धू कोमजवार, अशोक काटले, सुनील वाडबुद्धे अन्य सदस्य उपस्थित होते.
दत्तात्रयनगरातील श्री संत ज्ञानेश्वर उद्यानात सुगंधित बगीचा" उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने २.३३ कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली होती. निविदा मंजूर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वीच भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. गेल्या आठवड्यात कंत्राटदारांच्या मजुरांनी उद्यानातील ट्रॅकच्या दुतर्फा असलेल्या हिरवी झाडे तोडली. या कामास उद्यानात फिरायला येणाऱ्या अनेकांनी विरोध दर्शविला. हिरवे झाडे तोडण्याऐवजी त्याच्या बाजुला नवीन झाडे लावण्याची सल्लाही देण्यात आला. नव्या उपक्रमासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागणार असून उद्यान तोपर्यंत बंद ठेवण्याच्या तयारीत महापालिका आहे. उद्यानात चारही बाजुंनी नांगरटी करून जमीन उकरण्यात आली आहे. उद्यानातील व्यायाम करण्यासाठी लावलेली काही साहित्यही काढून टाकण्यात आले. विकास कामाला आमचा विरोध नाही, नागरिकांना आरोग्य जपण्यासाठी उद्यानात मूलभूत सुखसोयी पूर्ण व्हायला हव्यात. परंतु, उद्यानातील कामे ही टप्या-टप्प्यात करून कोणतीही वृक्षतोड न करता, उद्यान बंद न ठेवता करावीत. अर्धे उद्यान नागरिकांना त्यांचे नियमीत आरोग्य जपण्यासाठी मोकळे ठेवावे व अर्ध्या उद्यानात कामे करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना दत्तात्रयनगर उद्यान मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडारकर, सहसचिव बबन गांजरे, पांडुरंग वाकडे, सिद्धू कोमजवार, अशोक काटले, सुनील वाडबुद्धे अन्य सदस्य उपस्थित होते.