- भक्तिनाट्य ‘गणू - गण गण गणात बोते' चा प्रयोग 25 रोजी
नागपूर : दासगणू महाराज रचित श्री गजानन विजयग्रंथाचे मौखिक पारायण भक्तगण नेहमीच करतात. परंतु, ‘गणू - गण गण गणात बोते ' मधील नाट्य प्रसंग, गीत, संगीत, एलएडी स्क्रीनवरील दृश्याच्या माध्यमातून गजानन महाराजांच्या भक्तांना नाट्य रुपात पारायण करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
दासगणू महाराज रचित श्री गजानन विजयग्रंथावर आधारित भक्तिनाट्य ‘गणू - गण गण गणात बोते' चा प्रयोग बुधवार, 25 रोजी आयोजन करण्यात आला आहे. स्व. सचिन सराफ मेमोरियल ट्रस्टनिर्मित हे नाट्य, नृत्य, संगीत व दृश्यांनी परिपूर्ण नाटक म्हणजे गजानन भक्तांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या या नाटकाची निर्मिती अनघा सराफ व वृंदा सराफ यांची आहे. लेखक व दिग्दर्शक देवेंद्र बेलणकर असून संयोजिका व सहदिग्दर्शक रुपाली कोंडेवार-मोरे आहेत. गजानन महाराजांची भूमिका डॉ. पीयूष वानखेडे करीत असून इतर प्रमुख भूमिकांमध्ये देवेंद्र दोडके, राजेश चिटणीस, सचिन गिरी, तसेच, नागपुरातील 75 कलावंतांचा सहभाग आहे. ग्रंथातील काही प्रसंग एलएडी स्क्रीनवर दृश्य रुपात अवतरणार असून महाराजांनी केलेले चमत्कार स्पेशल इफेक्टच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
विजय ग्रंथ पोथीचे पारायण व्हावे, या उद्देशाने त्यातील प्रसंग, नाट्य, गीत, संगीत, दृश्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा व तो काळ जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र बेलणकर यांनी सांगितले. या नाटकाचे संगीत, पार्श्वसंगीत, तसेच गीतकार शैलेश दाणी असून यातील गीते मनोज साल्पेकर व शैलजा नाईक यांनी लिहिलेली आहेत. संकलन मनोज पिदडी यांचे, रंगभूषा बाबा खिरेकर यांची, नृत्य दिग्दर्शन अमोल मोतेवार यांचे, प्रकाश योजना किशोर बत्तासे यांची तर नेपथ्य सतीश काळबांडे यांचे आहे. दिग्दर्शन सहाय्य अभिषेक बेल्लारवार व अमित काळबांडे करतील. प्रयोग व्यवस्थापक अभय अंजीकर व दीपक गोरे यांचे असून यातील स्पेशल इफेक्टची जबाबदारी योगेश हटकर यांनी सांभाळलेली आहे. नरेश गडेकर, मुकुंद वसुले आणि सारंग जोशी यांचे नाटकासाठी विशेष सहाय्य लाभले आहे. या अभूतपूर्व भक्तिनाट्याचा प्रयोग निःशुल्क असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.