नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैनला शनिवारी न्यायदंडाधिकारी न्यायायलाने शुक्रवारपर्यंत (२७ आॅक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. बुकी सोंटू जैनची नव्याने चौकशी करण्यात येणार आहे. शनिवारी सोंटूची पोलीस कोठडी समाप्त झाल्यामुळे गुन्हे शाखेने त्याला न्यायालयात हजर केले. या बनावट आॅनलाईन गेमींग अॅप फसवणूक प्रकरणाचा चौकशी तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला ९ दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती केली होती. परंतू न्यायालयाने सोंटूला २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. आता पुन्हा २७ आॅक्टोबरपर्यंत कोठडी मिळाल्याने पोलीस सोंटूची नव्या पध्दतीने कसून चौकशी करणार आहे. १६ आॅक्टोबरला दुपारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी उके यांच्यासमक्ष सोंटूने आत्मसर्मपण केले होते.
सोंटूने बनावट आॅनलाईन गेमींग अॅप बनवून देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींनी फसवणूक केली आहे. सोंटूकडे शेकडो कोटींची संपत्ती असून ती संपत्ती त्याने अनेक नातेवाईक, मित्र आणि नोकरांच्या नावे करून ठेवली आहे. तसेच त्याने कोट्यवधीची रोख रक्कम कुठेतरी दडवून ठेवली आहे. गोंदियातील सोंटू जैनने नागपुरातील तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पळून गेला होता. सोंटूच्या घरातून १५ किलो सोने, ३०० किलो चांदी आणि १८ कोटींची रक्कम जप्त केली. तसेच जवळपास १०० कोटींची अन्य मालमत्ता जप्त केली. पोलीस सोंटूची कसून चौकशी करून या प्रकरणाचा तपास करीत आहे.