२०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर, विकसित बनविण्याचा संकल्प करुया - नितीन गडकरी

    21-Oct-2023
Total Views |
- अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
- ५ हजार अमृत कलश दिल्लीला रवाना होणार

Nitin Gadkari at Mahakalash Yatra 

नागपूर :
२०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूर जिल्हा प्रशासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचा आज कोराडी येथील सेवानंद विद्यालय येथून यात्रेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा प्रामुख्याने उपस्थित होत्या.
 
 
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, सामाजिक आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे घटक मागे आहेत, त्यांना पुढे नेण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताची अर्थव्यवस्था येत्या काळामध्ये ३ मिलियन डॉलरपर्यंत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धनाचा कामाला गती देण्यात येईल तसेच ड्रिप इरिगेशनचा उपयोग करण्यात येईल. शेती समृद्ध करून शेतकऱ्यांचा विकास करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
जिल्ह्यामध्ये १ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून आलेले अमृत कलश पंचायत समिती कार्यालयात संकलित करण्यात आले. तेथून तालुका कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. २२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान राज्यात सर्व तालुक्यातील कलश मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार आहेत. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे अमृत कलश घेऊन युवक रवाना होतील. १ नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात अमृत वाटिकेमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
 
Amrut Kalash 
 
अमृत कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला, नागरिक तसेच जवळपास ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये सेवानंद विद्यालय, सेवानंद पब्लिक स्कुल, स्मिता पाटील विद्यालय महादुला, तेजस्विनी विद्यालय कोराडी, विद्यामंदिर कोराडी, प्रागतिक विद्यालय कोराडी याचा सहभाग होता. लेझीम पथक, ज्ञानेश्वर महाराज भंजन मंडळ महिला ढोलताशा पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा सुरूवातीला उपस्थितांना पंचप्राण शपथ देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
नागपूर अपघात मुक्त करण्याचा संकल्प
देशात रोज दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. यामध्ये १८ ते ३४ वर्ष वयोगटातील युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नियमाचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ या कार्यक्रमामध्ये रूल ऑफ रोडचे पालन करून नागपुरला अपघात मुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले.