भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

    15-Jul-2022
Total Views |

monkeypox(Image Source : Internet) 
 
नवी दिल्ली :
संसर्गजन्य आणि प्राणघातक मंकीपॉक्स आजाराने भारतातही एन्ट्री केली आहे. केरळ राज्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले असून या आजारावर आला घालण्यासाठी तयारीही सुरु केली आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालय मंकीपॉक्स आजारावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. याशिवाय, आरोग्य-कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. मंत्रालयाने राज्य सरकारांना पाळत वाढवण्यास सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणती पावले उचलली पाहिजेत, हे सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे:
- परदेशातून परतलेले लोक आणि आजारी लोकांच्या नजीकच्या संपर्कात जाऊ नये. विशेषतः त्वचा आणि जननेंद्रियाच्या जखमा असलेल्या लोकांपासून दूर रहा.
- माकडे, उंदीर, खार, वानरांच्या इतर प्रजातींपासून दूर राहा.
- मृत किंवा जिवंत वन्य प्राणी आणि इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळा.
- आफ्रिकेतील वन्य प्राण्यांपासून बनवलेली उत्पादने (क्रीम, लोशन, पावडर) वापरू नका.
- आजारी लोकांद्वारे वापरलेली दूषित सामग्रीचा वापर टाळा (जसे की कपडे, अंथरूण किंवा आरोग्य सेवा पुरवठा)
 
केरळमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद
केरळमधील कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, यूएईहून केरळला परतलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली आहेत. तसेच राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी एक उच्चस्तरीय टीम केरळला पाठवण्यात आली आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.