भाग बारा : पूर्वांचलातील स्वतंत्रता सेनानी

    14-Jun-2022
Total Views |

senani
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : ब्रिटीशांच्या (British) जोखडातून भारत स्वतंत्र (Independent India) करण्याकरिता देशभर सर्वत्र विरोध आंदोलने झाली. अनेक देशभक्तांनी (Freedom fighters) आपले जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेचले, प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्याच्या या महासंग्रामात ईशान्य भारत (East India) देखील मागे नव्हता. गेल्या आठवड्यात देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनानिमीत्ताने त्यापैकीच्या काही थोरांची थोरवी आपण या लेखात पाहणार आहोत.
 
ईशान्य भारतात इंग्राजांचा प्रवेश १८०० च्या सुमारास झाला. ब्रिटीश-ब्रम्हदेश युद्ध १८२४-१८२६ मध्ये झाले. पहिले जागतिक महायुद्धात पूर्वांचलातील अनेक जनजातीच्या तरुणांना इंग्रजांनी युद्धसैनिक बनवून फ्रांस, मेसोपोटेमिया आदी विविध ठिकाणी लढण्यासाठी पाठवले होते. तिकडून परत आल्यावर नवे विचारवारे या प्रदेशात वाहू लागले. उत्तर आसामचा प्रदेश, दक्षिण आसामचा कछार प्रदेश आणि याला लागून असलेल्या पहाडी जनजातीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. आपल्या मिशनरी योजनेतून या भोळ्या लोकांचे मतांतरण करण्याचा पूर्ण जोरकस प्रयत्न केला गेला. याला या जनजातीनी पूर्ण ताकदीने विरोध केला. हा संघर्ष सशस्त्र असाच होता. नागालँड, मणिपूर, कछार, मेघालयातील गारो, तुरा, खासी पहाडातील शूरवीर जनजातींनी इंग्राजांची मोठी हानी केली. आपल्या शिस्तबद्ध कवायती सैन्याच्या जोरावर आणि आधुनिक बंदुकींच्या जोरावर इंग्राजांनी हे उठाव दडपून टाकले.
 
पण देशभक्तीची ही आग थंड झाली नाही. पुढे गांधीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा ही स्वातंत्र्यज्योत अधिक प्रखरतेने उजळून निघाली. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या संग्रामात सहभाग घेतलेल्या पूर्वांचलातील या क्रांतिकारकांचा विशेष सन्मान करण्याचे ठरवले आहे. अशाच शुरवीरांच्या कार्याचा घेतलेला हा अल्प आढावा.

१) राणी गाइदिन्ल्यू - नागालँड (२६ जानेवारी १९१५ - १७ फेब्रुवारी १९९३)
प्रबळ ब्रिटीश सैन्याशी सशस्त्र लढा देणारी रणरागिणी राणीमॉ गाइदिन्ल्यु या नावाने संपूर्ण देशात सुप्रसिद्ध आहे. ब्रिटीश साम्राज्यवादाविरुद्ध सशस्त्र लढा उभारण्याच्या कामात ज्यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील त्यात राणीमॉचा क्रमांक असेल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण असे आहे. १९३० ला ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्धचा लढा सुरु झाला. मणिपूर आणि नागालँडच्या टेकड्या याची साक्ष आजही देतात.
 
त्यांचा जन्म तामेंगलाँग जिल्ह्यातील नुंगको या छोट्या गावात रोंगमाई नागा जमातीत २६ जानेवारी १९१५ रोजी झाला. त्याठिकाणी शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी हेराक्का या धार्मिक चळवळीत प्रवेश केला. नागा धर्माचे पुनर्रुजीवन करण्याचे जदोनांग यांनी प्रयत्न सुरु केले.
 
ब्रिटीशांनी यात मोडता घालण्याचा प्रयत्न चालवला. गरीब नागांकडून ब्रिटिशांनी कर वसुली करण्यास सुरुवात केली. आता जदोनांग ब्रिटीशांच्या विरुद्ध सशस्त्र लढाईस उभा राहिला. आपली पवित्र भूमी या गोऱ्या इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करायची असे ठरवले. कछार भागातून बंदुकी आदी जमवल्या. या संघर्ष टिपेला पोचला असताना जदोनांग पकडला जावून १९३१ मध्ये फासावर चढवल्या गेला. आता हे नेतृत्व आपोआप राणीमॉ गाइदिन्लु यांचेकडे आले.
 
एक तीव्र संघर्ष सुरु झाला. ऑक्टोबर १९३२ कॅप्टन मेक्डोनाल्डच्या आसाम रायफल्सने माहितीच्या आधारावर छापा घातला आणि राणीमॉ पकडल्या गेल्या. खुनाचे आरोप सिद्ध झाले अन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १४ वर्षे ब्रिटीशांच्या गुवाहाटी, शिलाँग, तुरा, आईझ्वोल अशा विविध तुरुंगात राहूनही राणीमॉचा विश्वास ढळला नाही. देश स्वतंत्र होता होता त्यांची सुटका झाली. आपल्या पुरातन नागा संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. पण त्याला बाप्टीस्ट मिशनरयांनी विरोध करायला सुरुवात केली. पण राणीमॉ आपल्या ध्येयावर अखेरपर्यंत अडीग राहिल्या. भारतमातेच्या सेवार्थ त्यांनी आपला देह झिजवला.
 
२) यू तिरोत सिंग - मेघालय (जन्म - १८०२ - १७ जुलाई १८३५)
१८२६ मध्ये ब्राम्हदेशाशी युद्धसंधी झाल्यानंतर ब्रिटीशांनी आसामच्या इतर भागांवर प्रभुत्व दाखवण्यास सुरुवात केली. यासाठी सुयोग्य आणि अंतर कमी करणारे रस्ते बनवण्याची आवश्यकता होती. डेविड स्कॉट या अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. गुवाहाटी ते (बांगलादेशाच्या) सिल्ह्ट सुरमा व्ह्याली या दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता बांधावा लागणार होता. यामुळे वेळ वाचून सैन्य संचालन करण्यास सोयीचे होणार होते. अर्थात हा रस्ता मेघालयाच्या खासी पहाडातून जाणारा होता. स्कॉटने खासी प्रमुखाशी चर्चा करण्याची तयारी केली. नोंग्ख्लो भागात यू तिरोत सिंग हाच नेता असल्याने त्याच्याशीच बोलायचे असे ठरले. चेक पोस्टवर खासी जनजातीचा कब्जा राहून या व्यापारी मार्गावर तिरोत सिंगचा पगडा राहणार असे ठरले होते . योजना तिरोत सिंग यांनी मंजूर केली. आसामच्या राजाने मात्र यास विरोध दर्शवला. दोन राजात युद्ध छेडले. याचवेळी हा मार्ग पूर्ण झाल्यावर इंग्रज या मार्गासाठी जादा कर वसूल करणार असे लक्षात आले याबरोबर ब्रिटीशांचा कावा लक्षात आला.
 
नोंग्ल्खोतून ब्रिटिशांनी माघारी जावे, असा हुकुम यू तिरोत सिंग यांनी काढला तो ब्रिटिशांनी नाकारला आणि १८२९ साली तिरोत सिंगाने ब्रिटीश छावणीवर हल्ला केला. डेविड स्कॉट कसाबसा वाचला. तो चेरापुंजीला पळाला. सिल्ह्ट आणि कामरूप मधून ब्रिटीश फौजा बोलावण्यात आल्या त्या खासी पहाडात शिरल्या. युद्ध झाले. आधुनिक शस्त्रे खासी सेनेवर भारी पडली. अखेर ९ जानेवारी १८३३ साली तिरोत सिंग ब्रिटिशांना शरण आला. युद्ध गुन्हेगार म्हणून त्याच्यावर खटला चालला. ढाका येथे त्यांना तुरुंगात बंद करण्यात आले. अखेर १७ जुलाई १८३५ साली कारागृहातच त्यांचे निधन झाले.
 
३) मनिराम दीवान - असम (१८०६ -१८५८)
अहोम राजवटीत उच्च पदावर असलेल्या बरुआ घराण्यातील मणीराम यांचे घराणे एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत या अर्थाने प्रसिद्ध होते. आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिलेले मणीराम यांना इंग्रज सरकारने तहसीलदार म्हणून नियुक्त केले. जनजाती लोक एक विशिष्ट वनस्पती उकळवून पितात व त्यामुळे उत्तेजना येते याची माहिती त्यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांना दिली. ब्रिटीशांना यात फायदा दिसला. नीट संशोधन, नियोजन करण्यात येवून आसामात चहा मळ्यांच्या लागवडीला सुरुवात झाली. त्यांच्या या कामामुळे १८३९ त्यांना असम टी असोसिएशनचे ‘दिवाण’ पद मिळाले. पुढे इंग्रज सरकारशी खटके उडाल्याने त्यांनी ही नोकरी सोडली आणि स्वतःचा चहा मळा लावला, असे करणारे ते पहिले भारतीय उद्योगपती ठरले. पुढे अनेक व्यवसाय उद्योग त्यांनी उभारले.
 
त्यांनी अहोम राजा पुरंदरसिंग यांच्या दरबारी पंतप्रधान या नात्याने आपली सेवा देण्यास प्रारंभ केला. ब्रिटीशांनी या दरम्यान लोकांवर जुलमी सारा वसुली लावली. अफूची शेतीला प्रोत्साहन देणे, लोकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणे, स्थानिक हस्तकला उद्योगावर निर्बंध आणणे यामुळे मणिराम इंग्रंजाचे एक प्रबळ विरोधक बनले. अहोम राज्य पुन्हा बहाल व्हावे यासाठी कोलकोता येथील सदर कोर्टात त्यांनी खटला दाखल केला, जो अर्थात फेटाळला गेला.
 
याच दरम्यान १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध पेटले, यादरम्यान मणीराम यांचा अनेक क्रांतीकार लोकांशी संबंध आला. राजे कंदर्पेस्वर सिंग यांचे राज्यारोहण व्हावे यासाठी त्यांनी अनेक हिंदी सैनिकांशी संधान बांधले. इंग्रजांना उखडून फेकण्याची योजना आकाराला येवू लागली. जोरहाट येथे दुर्गापूजा उत्सवात या मोहिमेचा शुभारंभ करण्याचे ठरले. शिवसागर आणि दिब्रुगढ ही शहरे सुद्धा पाठोपाठ जिंकून घेण्याचे ठरले, पण घात झाला. ही योजना उघड झाली मणीराम आणि त्यांचे सहकारी कोलकोता येथेच पकडले गेले. त्यांना जोरहाट तुरुंगात आणले गेले. शिक्षा झाली, मणिराम आणि त्यांचे सहकारी पियाली बरुआ यांना २६ फेब्रुवारी १८५८ रोजी फाशी देण्यात आली.
 
४) शूरवीर खुंगचेरा - मिझोरम
ब्रिटीशांनी १८९० च्या सुमारास मणिपूर मिझोरम मधील लुशाई टेकड्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला. इंग्रजांचा वाढता हस्तक्षेप, मिशनरी लोकांचा मतांतारणाचा चालेला प्रयत्न यामुळे या भागातील लोक शुब्ध होते. तरुण शूरवीर खुंगचेरा याने इंग्राजाच्या या कृत्याचा सशस्त्र विरोध केला. हा लढा अधिक तीव्र होत आहे, असे दिसताच इंग्रजांनी पद्धतशीरपणे छापामार पद्धतीने युद्ध छेडले. मिझो तरुण खुंगचेरा यांच्या नेतृत्वात गनिमीकावा पद्धतीने लढत असताना एका चकमकीत शूरवीर खुंगचेरा यांना वीरमरण आले. आपली मातृभूमी विदेशी आक्रमणापासून मुक्त रहावी, याकरिता लढला गेलेला हा लढा अमर झाला.
 
५) मातुमूर जमोह - अरुणाचल प्रदेश
सन १९०० च्या सुमारास ब्रिटीशांनी आसाम लगतच्या पहाडात प्रवेश केला, या भागात त्यांचा कारवाया वाढल्या. इंग्रजांचा पहाडी लोकांच्या दैनंदिन व्यवहारात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढला. यामुळे जमोह हा याविरुद्ध उभा राहिला आपल्या गावात त्याने जनजागृती केली. याची ठिणगी १९११ मध्ये पडली नोवेल विल्सन या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या केली. जमावाने आणखी एक गोऱ्या अधिकाऱ्याला यमसदनी पाठवले. पहाडी जनजातीचे लोक असे काही कृत्य करतील याची कल्पना इंग्रजांना नव्हती. जमोह आणि त्यांच्या सहकार्याला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली.
 
६) संबुधन फोंगलो - कछार
पर्वतीय प्रदेशात दिमासा जनजाती लोक राहतात. इंग्राजांनी फोडा आणि राज्य करा ही नीतीभारतात अनेक ठिकाणी वापरली. सन १८३२ च्या पुढे कछार या पर्वतीय प्रदेशाचे दोन भाग करण्याची कुटील नीती इंग्रजांनी वापरली. यामुळे उत्तर आणि दक्षिण कछार असे दोन भाग झाले. लोक विभागले गेले. प्रदेशाचे विभाजन करून लोकांत मानसिक अंतर वाढवून भेद वाढवण्यासाठी या नीतीचा वापर केला गेला. तरुण संबुधन याच्या विरोधात उतरला. उत्तर कछार प्रदेशात त्याने एक सशस्त्र सेना उभारली. इंग्रजांशी संघर्ष सुरु झाला. गोरिला युद्धात संबुधन वाकबगार होता. इंग्रजांशी अनेक दिवस युद्ध चालले. इंग्रजांची बरीच हानी झाली.
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.