भाग तेरा : पूर्वांचलातील स्वतंत्र्यता सेनानी - गांधी युग

    14-Jun-2022
Total Views |

gandhiji
(Image Source : Prasad Barve)
 
 
नागपूर : 'अंग्रेजो, भारत छोडो' या गांधीजींच्या घोषणेचा जबरदस्त परिणाम साऱ्या भारतवर्षावर झाला. सारा देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. आसामसुद्धा स्वतंत्रतेच्या महायज्ञात सामील झाला. महात्मा गांधी आसाममध्ये येऊन गेले. प. नेहरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरसुद्धा आसामच्या या नवजागरणाचे साक्षीदार होते. इंग्रजांविरुद्ध पेटून उठलेला हा प्रदेश दुसऱ्या एका वेगळ्याच समस्येशी लढत होता. १९४० नंतर याच वेळी प. बंगाल आणि आसाममध्ये मुस्लीम घुसखोरी पद्धतशीरपणे वाढवली गेली. याचबरोबर मुस्लीम लीगच्या कट्टरपंथीय दंगली सुरु झाल्या. आसाम भारतात राहते की जाते अशी स्थिती तयार होत होती.
 
१. कनकलता बरुआ - आसाम (२२ डिसेंबर १९२४ - २० सप्टेंबर १९४२)
९ ऑगस्ट १९४२ चे 'भारत छोडो' आंदोलनाचे लोण मुंबईच्या गवालिया टंक मैदानातून देशभर वणव्यासारखे पसरले होते. इथे आसामात यायला या वणव्याला फार वेळ लागलाच नाही. 'करा अथवा मरा' हेच ध्येय आता प्रत्येक भारतीयाचे झाले होते.
 
कृष्णकांत बरुआ आणि कर्णेश्वरी यांच्या पोटी कनकलताचा जन्म झाला. घरचे वातावरण देशभक्तीचे. गमेरीमध्ये मे १९३१ साली रैयत सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्योतीप्रसाद अग्रवाला यांचे प्रखर भाषण झाले. ज्योती प्रसांदाची लेखणी आसामात नवजागरणाचे काव्य, साहित्य यांचे सृजन करीत होती. आपल्या मामाबरोबर ७ वर्षाची छोटी कनकलता यात सहभागी झाली होती. देशभक्तीची ज्योत कनकलतेच्या ह्र्दयात पेटली.
 
स्वातंत्र्य युद्धाचा ज्वार आसामात भडकला. बिस्वनाथ जिल्यातील गोह्पूर हे गाव याला अपवाद कसे असेल. पोलीस ठाण्यावर तिरंगा झेंडा फैरावयाचा हा कॉंग्रेस कमिटीत कार्यक्रम ठरला. तरुण कनकलता याला अपवाद कशी असेल? मोठ्या जोशात कनकलता या आंदोलनाचे नेतृत्व करायला सिद्ध झाली. तिरंगा मार्च पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. पोलीस स्टेशनसमोर मोर्चा अडवण्यात आला. ‘थांबा...’ पोलीस इन्स्पेक्टरने बंदूक ताणली. कनकलता तेवढ्याच जिद्दीने पुढे चालली. इन्स्पेक्टरने गोळी झाडली आणि कनकलता खाली कोसळली.
 
२. भोगेश्वरी देवी फुकन (१८४२ - १९४२)
जन्म १८७२, १९४२ यावर्षी महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन पुकारले. अंग्रेजो भारत छोडो हा नारा आसाम प्रांतात पोहोचला. १९४२ आसामच्या नौगाव जिल्ह्यातील बेहरामपूर या गावात झालेल्या आंदोलनात सहभाग. या बेहरामपूर गावात त्यांनी एक महिलांचे संघटन बनवले. महिलांनी केवळ घरात न राहता बाहेर पडून सामाजिक आणि राजकीय वातावरणाचा अंदाज घ्यावा. इंग्रज सरकारने कॉंग्रेस कार्यालयाला कुलूप घातले होते. ते कुलूप तोडण्याचा निर्णय कॉंग्रेस च्या बैठकीत घेण्यात आला व इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन छेडण्याचे ठरले.
 
७० वर्षाच्या वृद्ध भोगेश्वरी देवींचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. उत्साही कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत कार्यालयाचे कुलूप तोडले. १३ सप्टेंबर विजयादशमीचा तो दिवस गावातील सर्व लोक कॉंग्रेस कार्यालया समोर उपस्थित झाले. सभा सुरु झाली. अचानक इंग्रज पोलिसांनी जमावावर लाठीमार सुरु केला. एकाच गोंधळ उडाला. भोगेश्वरी देवींनी तिरंगा हाती घेतला आणि काही महिलांसोबत लाठीमार करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांसमोर उपस्थित होत भारत मातेचा जयजयकार करू लागल्या. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचा परिणाम जमावावर झाला. भारत मातेचा जय जयकार, वंदे मातरमचा जयघोष सुरु झाला. लोकांत एकच उत्साह दिसू लागला. जमाव अनियंत्रित होताना पाहून कॅप्टन फिंच याने गोळीबाराचा आदेश दिला. आपली नात रत्नमाला हिला गोळी लागताच भोगेश्वरी देवींनी तिरंगा झेंडा हातात घेत फिंचच्या दिशेने पावले वळवली. तिरंगा झेंड्याच्या काठीने त्यांनी फिंचला दोन तडाखे हाणले. कॅप्टन फिंच घाबरला त्याने आपल्या पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. वंदे मातरम म्हणत ही वृद्ध स्वतंत्रता सेनानी आपले बलिदान देती झाली.
 
३. गोपीनाथ बरदोलोयी - आसाम
६ जून १८९० मध्ये नौगाव येथे जन्म. प्राथमिक शालेय तथा महाविद्यालयीन शिक्षण गुवाहाटीत तर पोस्ट ग्रज्युएशन कोलकोता येथे पूर्ण केले. वकिल होण्याची इच्छा. परंतु, घरच्या परिस्थितीमुळे गुवाहाटीला परत यावे लागले. एका शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आयुष्याला सुरुवात केली. महात्मा गांधीचा प्रभाव त्यावेळी सर्व युवावर्गावर होता तसा तो गोपीनाथवर देखील होता. पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपली वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि काही काळ वकिलीसुद्धा केली. कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. आपल्या संघर्शील नेतृत्वाने लवकरच आसाम प्रांताचे कॉंग्रेस कमिटीचे सचिव झाले. मुस्लीम लीगचे सैयद मोहमद सादुल्ला हे त्यावेळी मुस्लिमांचे प्रबळ नेतृत्व होते. १९३५ मध्ये प्रांतीय सभांच्या निवडणुका झाल्या. कॉंग्रेस सर्वत्र विजयी झाली. आसाममध्ये मुस्लीम लीगने इतर छोट्या पक्षांच्या सैयद सादुल्लाच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. गोपीनाथ विरोधी पक्ष नेते झाले.
 
१९३८ अंतर्गत लाथाळ्यानी सादुल्ला सरकार पडले आणि गोपीनाथ यांनी योग्य नेतृत्व साधत सगळ्यांच्या सहकार्याने कॉंग्रेसचे सरकार स्थापन केले. यादरम्यान मुस्लीम लीगने देशाची फाळणी होऊन मुस्लीम भाग वेगळा व्हावा, अशी रणनीती आखण्यास सरुवात केली. आसामच्या विस्तीर्ण सुपीक जमिनीवर मुसलमानी घुसपेठ सुरु झाली. सादुल्ला सरकारमध्ये ती झपाट्याने वाढली. याचवेळी मुस्लीम बहुल भागातील मुस्लीमांनी हिंदुवर हल्ले करण्यास दंगे/दंगली करण्यास सुरवात केली. पूर्व बंगाल (बांगलादेश), मधील हिंदू पलायन करून आसाम मध्ये येवू लागले.
 
दुसरे महायुद्ध सुरु झाले अन गांधीजींच्या सांगण्यावरून गोपीनाथ यांनी कॉंग्रेस सरकारचा राजीनामा दिला. त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. याचा फायदा सादुल्ला यांनी घेतला. पुन्हा सादुल्ला सरकार स्थापन झाले. हा खेळ १९४६ पर्यंत चालला. अखेर भारताची फाळणी झाली. परंतु, आसाम प्रांताला पूर्व पाकिस्तानात जोडण्याची मो. जीना आणि सैयद सादुल्ला यांची कपटी योजना गोपीनाथ बरदोलोयी यांच्या अथक प्रयत्नामुळे फसली आणि आसाम भारतात राहिले.
 
४. तरुणराम फुकन - आसाम (२२ जानेवारी १८७७ - २४ जुलै १९३९)
आसामच्या कॉंग्रेसच्या आंदोलनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व. तरुण राम यांनी गुवाहाटी येथे कोलकोता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात शिक्षण घेतले. वकिली करायची या उद्देशाने सन १९०१ मध्ये इंग्लंडमध्ये जावून ब्यारीस्टर झाले. तेथून परत आल्यावार कोलकोता येथे वकिली सुरु केली. परंतु, इंग्राजांचे अत्याचार, गुलामगिरीची जाणीव यामुळे त्यांनी वकिली सोडली आणि ते कॉंग्रेस पक्षात सामील झाले. महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर होता.
 
१९२१ साली गांधीजी आसाममध्ये आले. असहकार आंदोलनच्या या गांधीजींच्या पूर्ण प्रवासात तरुण राम फुकन गांधीजी सोबत फिरले. इंग्रजांनी या आंदोलनावर बंदी घातली आणि तरुण राम यांना कारावासात घातले. १९२६ साली ते गुवाहाटी कॉंग्रेस समिती चे सदस्य राहिले. नंतर स्वराज्य पार्टीच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान राहिले. महिलांच्या स्थितीत सुधारणा घडाव्यात या साठीचे त्याचे योगदान बहुमुल्य आहे. महिला समानता, सशक्तीकरण यासाठी त्यांनी कार्य केले.
 
५. कुशल कुनवर - आसाम (जन्म १९०५ - १५ जून १९४३)
जन्म १९०५ बालीजान गोलाघाट या गावात. महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाचा परिणाम शाळेत शिकत असताना छोट्या कुशलवर झाला आणि असहकार आंदोलनात तो सहभागी झाला. वयाच्या २१ व्या वर्षी तो पूर्णपणाने कॉंग्रेसमध्ये सक्रीय झाला. सुरवातीला शाळेत शिक्षक नंतर १९२७ साली चहा मळ्यात काम करत घरची आर्थिक स्थिती सांभाळली. १९३६ मध्ये नोकरीचा त्याग करीत स्वतंत्रता आंदोलनात सहभाग झाला. त्याच्या सक्रीय योगदान आणि प्रखर नेतृत्वगुणांमुळे लवकरच तो सारुपथार कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष झाला. १९४२ साली गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची सुरवात केली. ब्रिटीशांनी आंदोलन दडपण्यासाठी नेत्याची अटकसत्रे सुरु केली. आसामच्या सर्व मुख्य कॉंग्रेस नेत्यांना जेलमध्ये बंद करण्यात आले. अशावेळी स्थानिक नेतृत्वाने हे आंदोलन सांभाळले.
 
सर्वच तरुण अहिंसावादी नव्हते. ‘म्रृत्यू वाहिनी’ नावाची एक क्रांतिकारी संघटनेचा उदय झाला. ब्रिटीश सैन्याला रोखण्यासाठी रेल्वे गाड्यांचे रूळ उखडणे, पूल उडवणे आदि प्रकार आसाममध्ये सुरु झाले. १० ऑक्टोबर १९४२ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास सैनिकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला सरूपथार येथे अपघात केला गेला. ब्रिटीशांचे अनेक सैनिक या अपघातात मृत्युमुखी पडले.
 
ब्रिटीशांनी जुलूम जबरदस्ती सुरु केली. अनेक नागरिकांना मारहाण सुरु झाली. अन्याय अत्याचाराचा नंगा नाच सुरु झाला. कुशल कुनवर एक आघाडीचा नेता या नात्याने पकडला गेला. शिवसागर जिल्हा न्यायालयात खटला चालला. धर्मकांत डेका, घनश्याम सैकिया या दोघांबरोबर कुशल कुनवर यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. कुशल कनवर यांना १५ जून १९४३ रोजी जोरहाट जेलमध्ये फाशी देण्यात आली.

६. मोजे रिबा - अरुणाचल प्रदेश
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जनजागृती करणारे मोजे रिबा यांना ब्रिटीश सरकारने अटक करून तुरुंगात टाकले. भारत स्वतंत्र झाल्याच्या दिवशी त्यांच्या दीपा गावात म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी तिरंगा फडकावण्याचे भाग्य मोजे रिबा यांना मिळाले.
 
यासह शेकडो लोक या स्वातंत्र्य युद्धात जीवाची पर्वा न करिता सामील झाले. त्यांच्या त्यागाला लोकविलक्षण बलिदानाला अभिवादन करूया!
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.